पाणीचोरांनी मुख्य पाईपलाईनच फोडली
By admin | Published: January 23, 2017 02:16 AM2017-01-23T02:16:58+5:302017-01-23T02:16:58+5:30
पाणीचोरांनी अवैध कनेक्शन जोडताना पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईनच फोडली.
हंसापुरीतील घटना : मोठा अनर्थ टळला
नागपूर : पाणीचोरांनी अवैध कनेक्शन जोडताना पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईनच फोडली. ही घटना रविवारी दुपारी हंसापुरी येथे घडली. मुख्य पाईपलाईन फुटल्याने पाण्याचा फवारा विजेच्या तारांवर जात असल्याने लोकांमध्ये भीती पसरली.
हंसापुरी खदान येथे पाण्याची टाकी आहे. यात पाणीपुरवठा करणाऱ्या ३६ इंचाच्या मुख्य पाईपलाईनवर परिसरातील अनेक लोकांनी लपून कनेक्शन घेतले आहे. अनेक दिवसांपासून ही चोरी सुरू आहे. गेल्या
आठवडाभरापासून १५ ते २० नवीन पाईपलाईन टाकून ती मुख्य लाईनशी जोडण्याचे काम सुरू होते. मुख्य पाईपलाईन ही रस्त्यावरून चार फूट खोल आहे. अवैध कनेक्शन असल्याने पाणीचोर ती लाईन मुख्य लाईनशी जोडण्याची प्रतीक्षा करीत होते.
रविवारी मनपा व ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना सुटी होती. रस्त्यावर अधिक गर्दी नसल्याने पाणीचोरांनी सकाळच्या वेळी प्लंबरच्या मदतीने काम सुरू केले. कनेक्शन जोडण्याच्या प्रयत्नात मुख्य लाईन फुटली. यामुळे पाण्याचा फवारा २५ ते ३० फूट उंच विजेच्या तारांवर पडू लागला. यामुळे अवैध कनेक्शन जोडणारे घाबरले व प्लंबरसोबत पळाले. दरम्यान, परिसरातील नागरिक घटनास्थळी एकत्र आले. अनर्थ होण्याच्या शक्यतेने त्यांनी लगेच मनपा व ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. परिसरातील नागरिकांनीच प्रयत्न करून पाण्याचा फवारा बंद केला.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. परिसरातीलच एक स्थानिक नेता पाणीचोरांचा प्रमुख असल्याचे सांगितले जाते. तो पैसे घेऊन अवैध कनेक्शन जोडून देतो. या घटनेमुळे एक मोठा अनर्थ टळला. नागरिकांनुसार यात नेते व अधिकाऱ्यांची भूमिकाही संशयास्पद आहे. अनेकदा अवैध कनेक्शनबाबत तक्रारी करण्यात आल्या, परंतु काहीही कारवाई झाली नाही.(प्रतिनिधी)
गुन्हा दाखल होणार
यासंदर्भात ओसीडब्ल्यूचे अधिकारी राजेश कालरा यांनी सांगितले की, याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. मनपा आयुक्तांचीही मदत मागण्यात आली आहे. अवैध कनेक्शन घेणाऱ्यांचा पत्ता लावला जात आहे. प्लंबरलाही शोधले जात आहे.