नागपुरात पाणी समस्या; नागरिकांची नेहरूनगर झोनपुढे निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 10:48 PM2020-02-26T22:48:48+5:302020-02-26T22:49:56+5:30
बुधवारी नगरसेवक संजय महाकाळकर यांच्या नेतृत्वात नेहरूनगर झोन क्षेत्रातील बाराखोली निराला सोसायटीतील नागरिक माठ घेऊन नेहरूनगर झोन कार्यालयावर धडकले. जोरदार नारेबाजी करून संताप व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नेहरूनगर झोन क्षेत्रातील बाराखोली निराला सोसायटीत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. यासंदर्भात प्रभागाचे नगरसेवक संजय महाकाळकर यांनी झोनचे सहायक आयुक्त, जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता यांना वेळोवेळी निवेदन देऊन पुरेसा पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. परंतु प्रशासनाने याची याची दखल न घेतल्याने बुधवारी महाकाळकर यांच्या नेतृत्वात वस्तीतील नागरिक माठ घेऊन नेहरूनगर झोन कार्यालयावर धडकले. जोरदार नारेबाजी करून संताप व्यक्त केला.
दुरुस्तीच्या नावाखाली बाराखोली निराला सोसायटी परिसरात पाणीपुरवठा केला जात नाही. नळाला पाणी आले तरी पुरेशा दाबाने येत नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. शिष्टमंडळाने झोनच्या सहायक आयुक्त स्नेहा करपे यांना निवेदन दिले. जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पाच ते सहा दिवसात या भागातील पाणी समस्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली.
शिष्टमंडळात संजय महाकाळकर, प्रभाग अध्यक्ष अनिल शाहू, विजय राऊ त, याकूब खान, शरीफ अहमद, बब्बू अली, आबीद अली, अहेमद खान, हाजी युसूफ खाँ, हफीजा बेगम, शबनूर शेख, नगीना बेगम शेख नसीर, नसिया बेगम, सुगरा बी, सईदा परवीन, शकीरा बी, नूर खाँ आदींचा समावेश होता.