महाराष्ट्रातील प्रकल्प काठोकाठ; गतवर्षीपेक्षा साठा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 10:55 AM2020-11-02T10:55:46+5:302020-11-02T10:57:43+5:30
Nagpur News Water राज्यातील सहाही विभागांमधील जलसाठे जवळपास भरण्याच्या बेतात आले आहेत.
गोपालकृष्ण मांडवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - महाराष्ट्रातील सर्वच प्रकल्प यंदा काठोकाठ भरले आहेत. राज्यातील सहाही विभागांमधील जलसाठे जवळपास भरण्याच्या बेतात आले आहेत. औरंगाबाद विभागातील सहाही जिल्ह्यामधील बहुतेक मोठे प्रकल्प यंदा १०० टक्के भरले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा झालेली पर्जन्यवृष्टी हे त्यामागील कारण आहे.
राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे या सहाही विभागांमध्ये मोठे, मध्यम आणि लघु मिळून ३ हजार २६७ प्रकल्प आहेत. औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद आणि परभणी या सहा जिल्ह्यांमध्ये असलेल्या मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पामधील जलसाठा मागील वर्षी ऑक्टोबर अखेर फक्त ५५.२३ टक्के होता. या वर्षी ऑक्टोबरअखेर तो वाढून ८३.४९ टक्के झाला आहे. तेथील उस्मानाबाद जिल्ह्यातील निम्न तेरणा गतवर्षी २९ टक्के भरला होता. यंदा १०० टक्के भरला आहे. बीडमधील माजलगाव, हिंगोलीतील येलदरी, परभणीमधील निम्न दुधना हे मोठे प्रकल्पही यंदा १०० टक्के भरले आहेत.
यंदा काही अंशी कोकण वगळता सर्वच विभागात जलसमृद्धी दिसत आहे. कोकणातील पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे या तीन जिल्ह्यात लघु, मध्यम आणि मोठे मिळून १७६ प्रकल्प आहेत. मागील ऑक्टोबरअखेर ८८.४८ टक्के जलसाठा नोंदविण्यात आला होता. यंदा त्यात किंचित घट होऊन तो ८४.३९ टक्क्यांवर आला आहे. पालघर जिल्ह्यातील धामणी मोठ्या प्रकल्पात मागील वर्षी ऑक्टोबरअखेर १०० टक्के जलसाठा होता. यंदा ०.५० टक्क्यांनी तो मागे आहे. ठाणे जिल्ह्यातील उर्ध्व घाटघर मागील वर्षी ९०.८९ टक्के भरला होता, यंदा तो ७७.७३ टक्के भरला आहे.
...