‘वॉटर प्युरिफायर’ धूळ खात
By admin | Published: March 13, 2016 03:25 AM2016-03-13T03:25:56+5:302016-03-13T03:25:56+5:30
विद्यार्थ्यांचे आरोग्य ठणठणीत राहावे, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने भिवापूर तालुक्यातील काही जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना ‘वॉटर प्युरिफायर’ पुरविण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह : क्षारयुक्त पाणी प्यायल्याने आजार बळावण्याची शक्यता
नारायण चौधरी भगवानपूर
विद्यार्थ्यांचे आरोग्य ठणठणीत राहावे, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने भिवापूर तालुक्यातील काही जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना ‘वॉटर प्युरिफायर’ पुरविण्यात आले. काही शाळांमध्ये सदर संयंत्र बसविण्यात आले तर काही शाळांमध्ये त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ज्या शाळांमध्ये ‘वॉटर प्युरिफायर’ बसविण्यात आले, ते बिघडले असून, सध्या धूळ खात पडले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
क्षारयुक्त पाणी प्यायल्याने पोटाचे विविध आजार जडतात, असे एका पाहणीत आढळून आले. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने भिवापूर तालुक्यातील ज्या गावांमध्ये क्षारयुक्त पाणी आहे, त्या गावांमधील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना ‘वॉटर प्युरिफायर’ पुरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. लाखो रुपये खर्च करून ‘वॉटर प्युरिफायर’ खरेदी करण्यात आले आणि ते वेळीच संबंधित शाळा व्यवस्थापनाकडे हस्तांतरित करण्यात आले. सदर संयंत्र वापरणे सक्तीचे करण्यात आल्याने शाळांनी ते व्यवस्थित बसवून वापरायला सुरुवात केली. मात्र, काही दिवसांत त्यात बिघाड निर्माण झाल्याने तसेच त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ते निरुपयोगी ठरले.
‘वॉटर प्युरिफायर’साठी काही शाळांनी वेळेवर विजेचे नवीन कनेक्शन घेतले. मात्र, त्या शाळांमधील वर्गखोल्यांमध्ये वीजपुरवठा करण्यात आला नाही. या मशीन नळाला जोडाव्या लागतात. परंतु, बहुतांश शाळांमध्ये पाण्याची टाकी बांधण्यात आली नाही. त्यामुळे तिथे नळदेखील लावण्यात आला नाही. या शाळांमधील विजेचे मीटर व इलेट्रिक फिटिंग सदोष असताना दोन वर्षांत त्यावर तोडगा काढण्यात आला नाही. राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेतच मध्यान्ह भोजन दिले जाते. भोजन आटोपल्यानंतर तसेच इतर वेळी विद्यार्थ्यांना क्षारयुक्त पाणी पिऊन तहान शमवावी लागते. पिण्यायोग्य नसलेले पाणी प्यावे लागत असल्याने विद्यार्थ्यांना पोटाचे आजार जडण्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केली.
भगवानपूर येथील प्राथमिक शाळेतील ‘वॉटर प्युरिफायर’ शाळेतील इलेक्ट्रिक फिटिंग दुरुस्त केल्यानंतर सुरू केली जाईल, अशी माहिती मुख्याध्यापक शंभरकर यांनी दिली. वर्गखोल्यांमध्ये विजेची सोय नसल्याने ‘सिलिंग फॅन’ सदैव बंद असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना उकाड्यात शिक्षण घ्यावे लागते. काही शाळांमधील वर्गखोल्यांमध्ये पुरेसा प्रकाशदेखील आत येत नाही. विद्यार्थ्यांना शाळेत ‘स्वच्छ पाणी, निरोगी आरोग्य’चे धडे दिले जातात. त्यांनाच क्षारयुक्त पाण्यावर रोज तहान शमवावी लागते. यावरून प्रशासन विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी किती जागरूक आहे, हे स्पष्ट होते.
वीजपुरवठा व भारनियमनाची समस्या
‘वॉटर प्युरिफायर’साठी शाळांमध्ये वीजपुरवठा असणे अत्यावश्यक आहे. ज्या शाळांमध्ये विजेची सोय नव्हती, त्या शाळांनीही वेळीच वीजपुरवठा घेतला. मात्र, शाळांमध्ये करण्यात आलेली इलेक्ट्रिक फिटिंग सदोष असल्याने या मशीनमध्ये अल्पावधीतच बिघाड निर्माण झाला. त्यात भारनियमनाने आणखी भर टाकली. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भारनियमन केले जाते. त्यातच कमी दाबाच्या विजेचा पुरवठा होत असल्याने ‘वॉटर प्युरिफायर’ निकामी झाल्याची माहिती जाणकारांनी दिली. सदर संयंत्रात बिघाड निर्माण झाल्याने ते दुरुस्त करण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने मेकॅनिकचा दोन वर्षांत शोध घेतला नाही, किंबहुना याबाबत जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीच्या शिक्षण विभागालाही कळविले नाही.
कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत
भगवानपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इलेक्ट्रिक फिटिंग सदोष आहे. ती दुरुस्त करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने ठराव पारित केला आणि आठ हजार रुपयांची तरतूद केली. या आठ हजार रुपयांमध्ये इमारतीची रंगरंगोटी व इलेक्ट्रिक फिटिंग करावयाची होती. ही रक्कम मुख्याध्यापक शंभरकर यांच्या सुपूर्द करण्यात आली. त्यांनी शाळेची रंगरंगोटी केली. कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे इलेक्ट्रिक फिटिंगचे काम रखडले आहे.
- अंकुश सवाई, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, भगवानपूर