१० जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 10:02 PM2019-04-20T22:02:27+5:302019-04-20T22:05:27+5:30

कमी पावसामुळे तोतलाडोह व पेंच नवेगांव खैरी या दोन्ही प्रकल्पामध्ये ६७.४४२ दलघमी इतका पाणीसाठा उपलब्ध असून पिण्याच्या पाण्यासह दररोज १.३० दलघमी पाणी वापर असल्यामुळे १० जूनपर्यंत पुरेल एवढेच पाणी या प्रकल्पात उपलब्ध आहे. पाणीसाठ्याची एकूण परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पाणी आरक्षण तसेच तोतलाडोह व पेंच नवेगांव खैरी प्रकल्पातील असलेल्या पाण्याचा आढावा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला. त्याप्रसंगी पिण्याचे पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात.

Water reservoir enough till June 10 | १० जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा

१० जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा

Next
ठळक मुद्देपाणी आरक्षणासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कमी पावसामुळे तोतलाडोह व पेंच नवेगांव खैरी या दोन्ही प्रकल्पामध्ये ६७.४४२ दलघमी इतका पाणीसाठा उपलब्ध असून पिण्याच्या पाण्यासह दररोज १.३० दलघमी पाणी वापर असल्यामुळे १० जूनपर्यंत पुरेल एवढेच पाणी या प्रकल्पात उपलब्ध आहे. पाणीसाठ्याची एकूण परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पाणी आरक्षण तसेच तोतलाडोह व पेंच नवेगांव खैरी प्रकल्पातील असलेल्या पाण्याचा आढावा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला. त्याप्रसंगी पिण्याचे पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात.
यावेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता बी. एच. स्वामी, महाजेनको कोराडीचे मुख्य अभियंता अभय हरणे, खापरखेडा विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता राजेश पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त राम जोशी, पेंच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जे. बी. तुरखेडे, कार्यकारी अभियंता बॅनर्जी, कळमेश्वरचे मुख्याधिकारी एच. डी. साखरखेडे आदी उपस्थित होते.
तोतलाडोह व पेंच नवेगांव खैरी प्रकल्पामध्ये सन २०१७-१८ या वर्षात कमी पावसामुळे अत्यल्प पाणीसाठा असल्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करुन पिण्याचे पाणी जास्तीत जास्त उपलब्ध होईल यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना करताना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले की, सद्यस्थितीत असलेल्या पाणी वापरानुसार २७.५० दलघमी पाण्याची तूट राहणार आहे. त्यामुळे संभाव्य पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्यात.
कळमेश्वरला कोच्छी प्रकल्पातून पाणी
नवेगांव खैरी प्रकल्पातील पिण्याचे पाणी मातीच्या बांधामुळे काढण्यास अडचण निर्माण होत असल्यामुळे जलाशयात फ्लोटिंग पंपाच्या माध्यमातून पाणी उपसा करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्यात. कळमेश्वर शहरातील पाणीपुरवठा पेंच उजव्या कालव्यातून करण्यात येत आहे. ३८ किलोमीटर कालव्यातून पाणी येत असल्यामुळे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे बंद नलिकेद्वारे पाणी उचलणे अथवा कोच्छी प्रकल्पातून पाणी उचलण्याच्या प्रस्तावाला गती देण्यात येऊन येत्या तीन महिन्यात ही योजना कार्यान्वित होईल यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
विद्युत केंद्रांना पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुरवठा
औष्णिक विद्युत केंद्रांना शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करणे बंधनकारक आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे ४७ दलघमी पाणी वीज निर्मितीकरिता पुरविण्यात येत आहे. त्यामुळे विद्युत प्रकल्पासाठी पाण्याचे प्रकल्पीय आरक्षण करताना पुनर्वापर केलेल्या पाण्याला प्राधान्य देण्यात यावे, असे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.
पाणी काटकसरीने वापरा
उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करुन शुद्ध पिण्याच्या पाण्याचा इतर कामासाठी कुठेही वापर होणार नाही. यादृष्टीने महानगरपालिकेतर्फे तात्काळ उपाययोजना कराव्यात. नागरिकांनीही पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे. उन्हाळ्यात कुलरसह इतर वापरासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून इतर कामांकरिता केवळ विहिरीच्या अथवा बोअरच्या पाण्याचा वापर नागरिकांनी करावा यासाठी जनजागृती मोहीम शहराच्या विविध भागात राबवावी. तसेच टिल्लू पंपद्वारे पाणी घेणाऱ्या नागरिकांवर कारवाई करुन त्यांचे टिल्लू पंप जप्त करावेत, असे निर्देश यावेळी देण्यात आले. इतर वापरातील शुद्ध पाण्याची बचत केल्यास १० टक्के पाण्याची बचत होणार आहे.
तसेच दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यास पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात जलसंपदा विभागाने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.

Web Title: Water reservoir enough till June 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.