नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील गावांमध्ये जलक्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 10:19 PM2018-06-16T22:19:02+5:302018-06-16T22:19:12+5:30

अवघ्या महाराष्ट्राला दुष्काळाच्या गर्तेतून बाहेर काढण्याच्या इराद्याने ‘पाणी फाऊंडेशन’ने चळवळ उभारली. नागपूर जिल्ह्यातील ‘ड्राय झोन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नरखेड तालुक्यातील तब्बल ६६ गावांचा यावर्षी पाणी फाऊंडेशनने ‘वॉटर कप स्पर्धे’त समावेश केला. पाहता पाहता या चळवळीला लोकचळवळीचे रूप आले आणि या गावांमध्ये चक्क जलक्रांती अवतरल्याचे आता चित्र आहे. ही पाणी फाऊंडेशनच्या यशाची पावती असून त्यात लोकसहभागही तेवढाच महत्त्वाचा ठरला.

Water revolution in the villages of Narkhed taluka of Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील गावांमध्ये जलक्रांती

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील गावांमध्ये जलक्रांती

Next
ठळक मुद्देपाणी फाऊंडेशनच्या कार्याला मिळाली यशाची पावती : खंडविकास अधिकाऱ्यांनी केली कामाची पाहणी

गणेश खवसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवघ्या महाराष्ट्राला दुष्काळाच्या गर्तेतून बाहेर काढण्याच्या इराद्याने ‘पाणी फाऊंडेशन’ने चळवळ उभारली. नागपूर जिल्ह्यातील ‘ड्राय झोन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नरखेड तालुक्यातील तब्बल ६६ गावांचा यावर्षी पाणी फाऊंडेशनने ‘वॉटर कप स्पर्धे’त समावेश केला. पाहता पाहता या चळवळीला लोकचळवळीचे रूप आले आणि या गावांमध्ये चक्क जलक्रांती अवतरल्याचे आता चित्र आहे. ही पाणी फाऊंडेशनच्या यशाची पावती असून त्यात लोकसहभागही तेवढाच महत्त्वाचा ठरला.
नरखेड तालुक्यातील गावे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार करीत हजारो ग्रामस्थ या मोहिमेत स्वयंस्फूर्तपणे सहभागी झाले. तब्बल ४५ दिवस ग्रामस्थांनी रात्रंदिवस काम करून गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न चालविले. विशेष म्हणजे, यामध्ये गावातील आबालवृद्धांपासून बच्चेकंपनीपर्यंत सर्वच सहभागी झाले, हे विशेष! एवढेच काय ज्यांना जेवढे जमेल तेवढे पैसे या मोहिमेच्या खर्चासाठी स्वयंस्फूर्तीने दिले. यातून उभा झालेला निधी पाहता गावातील कोणतेच काम आता अशक्य नाही, हा आत्मविश्वासही या मोहिमेची फलश्रुती आहे. उमठा, बरडपवनी, गायमुख पांढरी, शेमडा, खैरगाव, मेंढला, वाढोणा आदी गावांसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये ही मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात आली.
पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यानंतर ते वाहून जाते. त्या पाण्याचा सदुपयोग होत नाही. परिणामी दुष्काळाचा सामना करावा लागतो. धावणाऱ्या पाण्याला चालायला शिकवणे, चालणाऱ्या पाण्याला थांबायला शिकवणे आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीत मुरायला शिकवणे हे पाणी फाऊंडेशनचे सूत्र आहे. यानुसार नरखेड तालुक्यातील ४५० ग्रामस्थांनी सत्यमेव जयते वॉटर कपचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांनी २५ गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली. स्पर्धेदरम्यान ४५ दिवस श्रमदान करून आपापल्या गावांमध्ये सी. सी.टी., डीप. सी. सिटी, नाला खोलीकरण, शेततळे, गॅबियन बंधारा, एल. बी. एस. आदी जलासंधारणाची कामे करण्यात आली. ग्रामस्थांनी पाणीसाठ्यासाठी जलपात्रे तयार केली. ती जलपात्रे भरण्यासाठी पावसाची वाट होती. दमदार पावसाने हजेरी लावली आणि ती जलपात्रे भरू लागली. गावातील पाणी वाहून गेले नाही.
गावातील पाणी गावातच साचल्याचे पाहून ग्रामस्थही आनंदी झाले. त्या जलपात्रासोबत सेल्फी काढून ग्रामस्थ आनंद व्यक्त करीत आहेत.या मोहिमेमुळे गावे दुष्काळमुक्त होण्याच्या मार्गावर आहेत, हे विशेष!
कौतुकाची थाप
लोकसहभागातून व श्रमदानाच्या माध्यमातून झालेल्या गावातील कामांची पाहणी नव्याने रुजू झालले खंडविकास अधिकारी दयाराम राठोड यांनी केली. गायमुख पांढरी, बरडपवनी, उमठा आदी गावांना त्यांनी प्रत्यक्ष भेट देत पाणी फाऊंडेशच्या माध्यमातून झालेल्या कामाची पाहणी करीत फाऊंडेशन आणि ग्रामस्थांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. ग्रामस्थांशी त्यांनी संवादही साधला. यावेळी ‘पाणी फाऊंंडेशन’चे तालुका समन्वयक रूपेश वाळके, अतुल तायडे, प्रवीण दहेकर, ओम खोजरे, भास्कर विघे यांच्यासह उमठा, बरडपवनी, गायमुख येथील नागरिक उपस्थित होते.
दुष्काळमुक्तीचा मार्ग सुकर
नरखेड तालुक्यातील गावांमध्ये डोंगर परिसरात पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून लोकसहभागातून जलसंधारणाची कामे ग्रामस्थांनी श्रमदानाच्या माध्यमातून पूर्ण केली. राज्याचा ५० टक्के भाग दुष्काळाने होरपळत होता. या दुष्काळग्रस्त भागाला दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी फाऊंडेशनने प्राधान्य दिले. जलसंधारणासह ग्रामस्थांमध्ये मनसंधारणाही यानिमित्ताने झाल्याने गावात एकोप्याचे वातावरण निर्माण झाले. वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या श्रमदानाच्या माध्यमातून ही कामे झाल्यामुळे लोकांना ही कामे आपली वाटू लागली आहेत. त्यामुळे गावागावात जलसाठे निर्माण झाले. राजकारण, गट-तट बाजूला सारून पाण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले. गावात पडणाऱ्या पावसाचा थेंब गावाच्या मालकीचा आहे, ही मानसिकता ग्रामस्थांमध्ये तयार झाली.
 रुपेश वाळके,
समन्वयक, पाणी फाऊंडेशन, नरखेड तालुका.

Web Title: Water revolution in the villages of Narkhed taluka of Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.