एकाच नळावर हजारो लोकांचा भार; पाण्याचा प्रश्न सुटणार तरी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2022 01:31 PM2022-02-07T13:31:07+5:302022-02-07T13:43:13+5:30

विठ्ठलनगरातील एका गल्लीमध्ये हा सार्वजनिक नळ आहे. या नळावर पिण्याच्या पाण्यासाठी वैष्णोमातानगर, चक्रपाणीनगर, सिद्धेश्वरीनगर, मेहरबाबानगर, शिल्पकारनगर या वस्त्या अवलंबून आहेत. उन्हाळ्यात तर पाण्यासाठी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो.

water, sanitation issue in nagpurs local ward areas | एकाच नळावर हजारो लोकांचा भार; पाण्याचा प्रश्न सुटणार तरी कधी?

एकाच नळावर हजारो लोकांचा भार; पाण्याचा प्रश्न सुटणार तरी कधी?

googlenewsNext
ठळक मुद्देरोटकर लेआऊटमध्ये घाणीचे साम्राज्यविठ्ठलनगर परिसरात पाणी प्रश्न

नागपूर : महापालिकेच्या हद्दीत २४ बाय ७ पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचा दावा महापालिका करीत आहे. मात्र, महापालिकेच्या हद्दीतील विठ्ठलनगर परिसरातील काही वस्त्यांना एकाच सार्वजनिक नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे. पहाटे ५ वाजतापासून रात्री एक वाजेपर्यंत चिल्ल्यापिल्ल्यांपासून वयोवृद्ध पाणी भरताना दिसून येतात.

विठ्ठलनगरातील एका गल्लीमध्ये हा सार्वजनिक नळ आहे. या नळावर पिण्याच्या पाण्यासाठी वैष्णोमातानगर, चक्रपाणीनगर, सिद्धेश्वरीनगर, मेहरबाबानगर, शिल्पकारनगर या वस्त्या अवलंबून आहेत. उन्हाळ्यात तर पाण्यासाठी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो. हजारो लोक नळावर पाण्यासाठी येत असल्याने भांडणेसुद्धा होतात.

विशेष म्हणजे, हा सार्वजनिक नळ २४ बाय ७ सुरू असतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात येथे २४ बाय ७ गर्दी दिसते. सध्या नळावर पहाटेपासूनच लोक पाण्यासाठी रांगा लावतात. दुपारी गर्दी थोडी ओसरत असली तरी सायंकाळपासून पुन्हा पाण्यासाठी कॅन घेऊन दूरवरून लोक येथे पोहोचतात.

आज येईल, उद्या येईल या अपेक्षेने गेल्या दहा वर्षांपासून ‘हर घर नल से जल’ची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत. आम्हाला सांगण्यात आले की कुठे तरी पाण्याच्या टाक्या बनल्या आहेत. तेथून पाणीपुरवठा अजूनही सुरू झालेला नाही. वर्षानुवर्षे आम्ही येथे राहत आहोत. वर्षभर पाण्यासाठी आम्हाला त्रास सहन करावा लागतो आहे, अशी भावना सुनील कांबळे, दिवाकर कानतोडे, अमित इंगळे, वाडगुजी वानखेडे यांनी व्यक्त केली.

- रोटकर लेआऊटमधील रहिवासी गटारीच्या घाणीने संतप्त

रोटकर लेआऊट येथील रहिवासी गटारलाईन नसल्याने चांगलेच संतप्त आहेत. वस्तीतील घरे टुमदार आहेत, पण गटारीच्या घाणीचा ठपका वस्तीवर लागला आहे. गटारलाईन नसल्याने लोकांनी बांधलेले सेप्टी टँक वारंवार ओव्हरफ्लो होतात. ही घाण सोडायची कुठे हा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. काही घरांना तर दर महिन्याला मनपाची गाडी बोलवावी लागते. त्यामागे २ हजार रुपयांचा खर्च करावा लागतो. काही लोकांनी घराशेजारी असलेल्या रिकाम्या प्लॉटवर घाण सोडलेली आहे. या वस्तीमध्ये यापूर्वी कॉलराची साथ पसरली होती. या घाणीमुळे आरोग्याचा प्रश्न भेडसावत असल्याचे येथील अनिल निळे, सुभाष भगत, सुभाष शेंडे, सुभाष रामटेके, राजेश निपाने, प्रणय पेठे यांनी व्यक्त केली.

- २० वर्षांपासून रस्ता नाही

शारदानगर, गजाननगर या वस्त्यांमध्ये अजूनही रस्ता बनलेला नाही. कच्च्या रस्त्यांमुळे लोकांना पावसाळ्यात प्रचंड त्रास होत आहे. वस्त्यांमध्ये विद्युत खांबाला लाईट नाही. रस्ते खराब, त्यात लाइट नाही, यामुळे लोक वैतागले आहेत. महापालिकेचा पाणीपुरवठा नसल्याने लोक विहिरी व बोअरवेलवर अवलंबून आहेत. श्यामनगरात रिकाम्या प्लॉटमुळे लोक वैतागले आहेत. रिकाम्या प्लॉटमध्ये परिसरातील घाण टाकली जाते. झाडेझुडपे वाढलेली आहेत. २० वर्षे झाली आम्ही राहत आहोत, किमान लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा गौपाल लोहकरे, तुषार मालखेडे, शंकर शेरसिया यांनी केली.

Web Title: water, sanitation issue in nagpurs local ward areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.