नागपुरात जलसंकट वाढले, नळातून अपुरे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 01:32 AM2018-03-31T01:32:23+5:302018-03-31T01:32:35+5:30
एप्रिल व मे महिन्यातील कडाक्याचे ऊन अजून बाकी आहे. पाराही पाहिजे तसा चढलेला नाही. मात्र, मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडण्याची चिन्हे दिसू लागली आहे. शहराचा मध्य भाग असो किंवा बाह्य भाग सर्वत्र नळाद्वारे अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही भागात तर काही मिनिटातच नळाचे पाणी बंद होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एप्रिल व मे महिन्यातील कडाक्याचे ऊन अजून बाकी आहे. पाराही पाहिजे तसा चढलेला नाही. मात्र, मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडण्याची चिन्हे दिसू लागली आहे. शहराचा मध्य भाग असो किंवा बाह्य भाग सर्वत्र नळाद्वारे अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही भागात तर काही मिनिटातच नळाचे पाणी बंद होत आहे.
शहरात दररोज ६३० ते ६४० दलघमी पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचा दावा महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने केला आहे. पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली नसताना नळाला येणारे पाणी एकाएक कमी कसे झाले, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. पूर्व नागपूरच्या पारडी पुनापूर, गुलमोहर नगर, विजय नगर, भारत नगर यासह अनेक वस्त्यांमध्ये गेल्या महिनाभरापासून नळाला येणाऱ्या पाण्याची धार मंदावली आहे. एक बादली पाणी भरण्यासाठी १० मिनीट लागत आहेत. काही भागात माती मिश्रीत पाणी येत असल्याची तक्रार आहे. जेथे दोन तास पाणी येत होते त्या भागात आता फक्त अर्धा तास पाणी येत आहे. मध्य नागपुरातील मोमिनपुरा, तकिया, नाईक तलाव परिसर, बोरियापुरा, टिमकी, डोबीनगर, अन्सारनगर आदी भागात दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. येथील काही भागात तर फक्त १५ ते २० मिनिटच पाणी मिळत आहे. नगरसेवकांकडे वारंवार तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
उत्तर नागपुरातील नारा, नारी, दीक्षित नगर या बाह्य भागातील वस्त्यांमध्ये अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. काही भागात तर दिवसाआड पाणी येत आहे. नगरसेवकांकडून तक्रारींची दखल घेतली जात नाही, मागणी करून टँकरही मिळत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. दक्षिण नागपुरातही तशीच परिस्थिती आहे. नळाची धार मंदावली आहे. भूजल पातळी घटल्याने विहिरीचे पाणी खोल गेले आहे. भाजपाचे नगरसेवक व नेते वास्तव्यास असलेल्या भागातच सुरळीत पाणी पुरवठा होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. शहरातील मार्च एडिंंगचे हे चित्र पाहता पुढे परिस्थिती आणखी कठीण होण्याची चिन्हे आहेत.
टिल्लू पंप जप्ती मोहीम राबविणार
पाणीपुररवठा कंपनी ओसीडब्ल्यूचे जनसंपर्क अधिकारी सचिन द्रवेकर यांनी सांगितले की, शहरातील पाणीपुरवठ्यात कपात झालेली नाही. उन्हाळ्याच्या दिवसात नागरिक अधिक पाणी मिळविण्यासाठी टिल्लू पंपाचा वापर करीत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळते. याची दखल घेत झोन स्तरावर टिल्लू पंप जप्तीची मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारीची दखल घेऊन प्रश्न सोडविला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पुरेसा पाणीपुरवठा होतोय : गायकवाड
जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता संजय गायकवाड म्हणाले, शहरात दररोज ६३० ते ६४० दलघमी पाणीपुरवठा होत आहे. पाणी कपात करण्यात आलेली नाही. भविष्यातही कपात केली जाणार नाही. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढते. वापर वाढतो. त्यामुळे नळाद्वारे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे त्यांनी सांगितले.