नागपूर शहरावर पाणीटंचाईचे भीषण सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 10:48 PM2018-03-14T22:48:35+5:302018-03-14T22:48:49+5:30
नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या नवेगाव खैरी व पेंच प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. गेल्या सव्वा महिन्यात नवेगाव खैरीतील जलसाठ्यात २५ टक्के तर पेंचमधील जलसाठ्यात ५० टक्क्यांनी घट झाली आहे. जलसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिल,मे महिन्यात शहरातील नागरिकांना पुरेसे प्पाणी मिळेल की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला असून भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या नवेगाव खैरी व पेंच प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. गेल्या सव्वा महिन्यात नवेगाव खैरीतील जलसाठ्यात २५ टक्के तर पेंचमधील जलसाठ्यात ५० टक्क्यांनी घट झाली आहे. जलसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिल,मे महिन्यात शहरातील नागरिकांना पुरेसे प्पाणी मिळेल की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला असून भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नागपूर विभागातील जलाशयात जेमतेम २१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आता उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने धरणातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात ४ फेब्रुवारी रोजी नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाºया नवेगाव खैरी प्रकल्पात ५०.८७ टक्के जलसाठा होता. आज येथे ३९.४५ टक्के जलसाठा आहे. नवेगाव खैरी जलाशयातील पाण्याची पातळी खोल गेल्यानंतर पेंच धरणातून या जलाशयात पाणी पुरविले जाते. ४ फेब्रुवारी रोजी पेंच धरणात २९.३२ टक्के पाणीसाठा होता. मात्र १४ मार्चला या प्रकल्पात केवळ १५.५१ टक्के पाणीसाठा आहे. केवळ सव्वा महिन्यात या दोन्ही जलसाठ्यातील पाण्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. एवढेच नव्हे तर १३ मार्च २०१७ च्या तुलनेतही या दोन्ही धरणात कमी पाणी उपलब्ध आहे. एवढेच नव्हे तर कन्हान नदीही कोरडी पडण्याच्या स्थितीत आहे. ही सर्व आकडेवारी बघता शहरावर पाणीटंचाईचे सावट आहे.
संभाव्य पाणीटंचाईचा विचार करता महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेणे अपेक्षित होते. मात्र, समित्यांचे सभापती सत्कार समारंभात व्यस्त आहेत. टंचाई निवारणासाठी महापालिकेने १२ कोटींचा कृती आराखडा तयार केला आहे. परंतु अद्याप या कामाला सुरुवात झालेली नाही.
उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढणार
उन्हाळ्याच्या दिवसात घराघरांत कूलर सुरू होतात. त्यामुळे पाण्याची मागणी वाढते. सध्या शहराला दररोज ६३० एमएलडी पाण्याचा पुरवठा के ला जातो. एप्रिल-मे महिन्यात शहराला ७०० एमएलडी पाण्याची गरज भासणार आहे. त्यानुसार शहरातील पाणीपुरवठ्यात वाढ करावी लागणार आहे. मात्र मर्यादित जलसाठा असल्याने मागणीनुसार पाणीपुरवठा होण्याची शक्यता कमी आहे.
निर्णयाची अंमलबजावणी नाही
संभाव्य पाणीटंचाईचा विचार करता महापौर नंदा जिचकार यांनी काही दिवसांपूर्वी आढावा बैठक घेतली. या बैठकीत पेंच धरणातून शहराला होणाºया पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. पाण्याच्या आरक्षणात कपात करू नये, अशी सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांना केल्या. तसेच स्थायी समितीच्या बैठकीत टंचाई कृती आराखड्याच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. मात्र यावर अद्याप अंमलबजावणी सुरू झालेली नाही.
शहराचा पाणीपुरवठा सुरळीत
सध्या शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत आहे. धरणातून अपेक्षित पाणी मिळत आहे. यात कोणत्याही प्रकारची कपात करण्यात आलेली नाही. असे असले तरी संभाव्य टंचाईचा विचार करता १२.८ कोटींचा कृती आराखडा तयार केला आहे. यात शहरातील विहिरींची स्वच्छता, विद्युत पंप बसविणे, नवीन बोअरवेल, हॅन्डपंप दुरुस्ती आदी कामांचा यात समावेश आहे.
अश्विन मुदगल, आयुक्त महापालिका
धरणात पुरेसा जलसाठा
नागपूर शहराला १९० द.ल.घ.मी. पाण्याची गरज आहे. आवश्यक असलेला जलसाठा धरणात उपलब्ध आहे. यात कपात करण्यासंदर्भात जलसंपदा विभागाकडून कोणत्याही प्रकारच्या अद्याप सूचना प्राप्त झालेल्या नाही.
संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता जलप्रदाय विभाग