नागपुरात जलसंकटाचे सावट : तलाव, धरणात अल्पसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:08 AM2019-02-22T00:08:33+5:302019-02-22T00:09:15+5:30

नागपूरसह संपूर्ण विभागावर पाणी संकट येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागातील जलाशयांमध्ये केवळ १७ टक्के पाणी शिल्लक आहे. उन्हाळा अद्याप सुरू झाला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात भीषण पाणी समस्या भेडसावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Water scarcity in Nagpur: low reservoir in the dam, lake | नागपुरात जलसंकटाचे सावट : तलाव, धरणात अल्पसाठा

नागपुरात जलसंकटाचे सावट : तलाव, धरणात अल्पसाठा

googlenewsNext
ठळक मुद्दे१७ टक्केच जलसाठा शिल्लक : मध्य प्रदेश सरकारला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरसह संपूर्ण विभागावर पाणी संकट येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागातील जलाशयांमध्ये केवळ १७ टक्के पाणी शिल्लक आहे. उन्हाळा अद्याप सुरू झाला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात भीषण पाणी समस्या भेडसावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विभागात ३७२ लघु, मध्यम व मोठे जलप्रकल्प आहेत. त्यांची एकूण क्षमता ४५९३.९ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या या प्रकल्पांत केवळ ७९१.३९ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे. १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये ३५५४ च्या तुलनेत केवळ १६ टक्के, म्हणजे ५६९ दशलक्ष घनमीटर पाणी उरले आहे. तसेच, ४० मध्यम प्रकल्पांत २१ टक्के तर, ३१ लघु प्रकल्पांत २० टक्के जलसाठा आहे. पेंच प्रकल्पाची परिस्थिती चिंताजनक आहे.
पाणी संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रशासन सक्रिय झाले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून चौराई धरणातील ५ एमएलडी पाणी पेंचमध्ये सोडण्याची मागणी केली आहे. मध्य प्रदेश सरकारने यावर अद्याप सकारात्मक उत्तर दिले नाही. त्यामुळे बावनकुळे यांनी यासंदर्भात कमलनाथ यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
भूजलाचा आधार
जलाशयांमध्ये केवळ १७ टक्के पाणी शिल्लक असले तरी उन्हाळ्यात जास्त पाणी कपात केली जाणार नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे. परंतु, येणारा पावसाळा असमाधानकारक राहिल्यास परिस्थिती बिघडेल. विभागात भूजलाची अवस्था चांगली आहे. जल संकटावर त्यामुळे मात करता येईल असे जाणकारांचे मत आहे.
पाणी काटकसरीने वापरा
महापालिकेतर्फे महिनाभरापूर्वी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री बावनकुळे यांनी नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले होते. सोबतच महापालिकेला पाण्याच्या गळतीचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळीच भविष्यात भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागू शकते, हे स्पष्ट झाले होते. आता महापालिकेला संभाव्य टंचाईचा धोका लक्षात घेता वेळीच उपाय योजावे लागणार आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर पाणी पेटणार
लोकसभेची निवडणूक एप्रिल- मे मध्ये होईल. हे उन्हाळ्याचे दिवस असतील. दरवर्षीच तशीही उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होते. मात्र, हा निवडणुकीचा काळ असल्यामुळे पाणी टंचाईचे ‘राजकीय’ चटके बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सत्तापक्ष भाजपाची चिंता वाढणार आहे.

Web Title: Water scarcity in Nagpur: low reservoir in the dam, lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.