वस्त्यात पाणी साचले, चौक बनले तलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:07 AM2021-07-09T04:07:21+5:302021-07-09T04:07:21+5:30
सदरमधील माऊंट रोडवर पावसाचे पाणी साचले. कामठी रोडवरील स्मृती टॉकीजकडे जाणाऱ्या कॉर्नरवरचा परिसर जलमय झाला. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली ...
सदरमधील माऊंट रोडवर पावसाचे पाणी साचले. कामठी रोडवरील स्मृती टॉकीजकडे जाणाऱ्या कॉर्नरवरचा परिसर जलमय झाला. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. पावसाळ्याच्या दिवसात येथे अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
...
वीज केंद्र व रस्त्याच्या बाजूने पाणी काढले
मेयो रुग्णालय डॉक्टरांच्या वसतिगृह परिसरात गडर लाईन तुंबणार नाही अशी व्यवस्था अपेक्षित होती. परंतु संबंधितांना मेयो रूग्णालय वसतिगृह परिसरातील गडर लाईन बोरियापुरा मुख्य मार्गावर काढली. तर दुसरी वीज केंद्र परिसरात जोडली. यामुळे बोरियापुरा मार्गावर पाणी साचते. गुरुवारी मेयो रुग्णालय परिसरात पाणी साचलेले पाणी बोरियापुरा परिसरापर्यंत तुंबले होते. यामुळे वाहन चालकांना अडचणींना सामोरे जावे लागले.
....
विट भट्टी परिसर जलमय
उत्तर नागपुरातील विट भट्टी परिसरात पाणी साचल्याने या परिसराला तलावाचे स्वरुप आले होते. वाहतूक विस्कळीत झाली. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसल्याने परिसरात पाणी साचते. आजूबाजूच्या दुकानात पाणी शिरले. साचलेल्या पाण्यात लहान मुलांनी खेळण्याचा आनंद घेतला.
...
यादव नगरातही साचले पाणी
प्रभाग ६ मधील यादव नगर परिसर पावसामुळे जलमय झाला होता. यादव नगर रस्ता मुखय रस्त्यांच्या खालच्या बाजूला असल्याने येथे पावसाचे पाणी साचते. या मार्गाचे मागील काही वर्षात डांबरीकरण झालेले नाही. यामुळे जागोजागी खड्डे पडले आहे. प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे.
...
काचीपुरा मार्गावर पाणी साचले
रामदासपेठ लगतच्या काचीपुरा मार्गावर सेंट्रल बाजार नजिक पावसाचे पाणी तुंबले होते. दुचाकी वाहने पाण्यात बुडाली होती. यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला. काचीपुरा रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी जमा झाले होते.
..
संघर्ष नगरात घरात पाणी घुसले
प्रभाग क्रमांक ३ मधील संघर्ष नगर परिसरात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांची समस्या वाढली. येथील हैदर अली मैदान व परिसरात सर्वत्र पाणी साचले होते. काही नागरिकांच्या घरात पाणी साचले होते. गडर लाईन नादुरुस्त असल्याने पावसाचे पाणी साचत असल्याचे नागरिकांनी सांगितले.