नागपुरात पाणी कपात सुरुच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:23 AM2019-08-06T00:23:25+5:302019-08-06T00:24:30+5:30

नागपूरसह विदर्भात पाऊस चांगला पडत आहे. पावसाचा बॅकलॉग दूर झाला असला तरी शहराला ज्या तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. तेथील परिस्थिती मात्र अजुनही सुधारलेली नाही. परिणामी एक दिवसा आड पाणी सोडण्याचा निर्णय आणखी २२ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय मनपा प्रशासनने घेतला आहे.

Water shortage will continue in Nagpur | नागपुरात पाणी कपात सुरुच राहणार

नागपुरात पाणी कपात सुरुच राहणार

googlenewsNext
ठळक मुद्देनवेगाव खैरीतील पाणीसाठा घटला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरसह विदर्भात पाऊस चांगला पडत आहे. पावसाचा बॅकलॉग दूर झाला असला तरी शहराला ज्या तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. तेथील परिस्थिती मात्र अजुनही सुधारलेली नाही. परिणामी एक दिवसा आड पाणी सोडण्याचा निर्णय आणखी २२ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय मनपा प्रशासनने घेतला आहे. जेव्हापासून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे तेव्हापासून दर सोमवारी तलावातील साठ्याचा आढावा घेतला जातो. त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जातो.
शहरात गेल्या दोन आठवड्यांपासून पाऊस सुरु आहे. परंतु ना तोतलाडोह तलाव भरने ना नवेगाव खैरीतील पाणीसाठ्याची स्थिती सुधारली. नवेगाव खैरीमध्ये ५ ऑगस्ट रोजी पाण्याची पातळी ३१८.५५ मीटर नोंदवण्यात आली आहे. तर तोतलाडोह तलावातील पातळी मृत साठ्याच्याही खाली गेले आहे. येथील मृतसाठ्याची पातळी १५१ एमएमक्यूब आहे. या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी ३० एमएमक्यूब पाण्याची आवश्यकता आहे. या दोन्ही तलावावर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अवलंबून आहे. या पावसाळ्यात हे दोन्ही तलाव भरले नाहीत तर शहरात एक दिवसा आड पाणीपुरवठ्याचा निर्णय आणखी पुढे वाढवला जाऊ शकतो.
सोमवारी मनपा पाणीपुरवठा विभाग आणि ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पाण्याच्या पातळीवर चर्चा झाली. तेव्हा पाण्याची पातळी वाढण्याऐवजी आणखी घटल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला. जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी सांगितले की, पाणी कपात सुरु राहील. धरणातील पाणीसाठ्यात वाढ न होणे ही शहरासाठी चिंतेची बाब आहे. भविष्यात काय होईल, त्यावर आताच काही बोलणे योग्य होणार नाही.

वाढण्याऐवजी घटत आहे पातळी
नवेगाव खैरी येथील पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे एक दिवसा आड कपातीचा निर्णय पेंचशी जुळलेल्या शहरातील भागांसाठी घेण्यात आला. शहराती जवळपास ७० टक्के भागाच पेंचमधून दररोज ५०० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. पेंचमध्ये नवेगाव खैरीमधून पाणी येते. नवेगाव खैरीमध्ये १५ जुलै रोजी जलस्तर ३१८.३६ मीटर होते. आठवडाभरानंतर २९ जुलै रोजी ते वाढून ३१८.६० मीटरपर्यंत पोहोचले. परंतु ५ ऑगस्ट रोजी येथील जलस्तर ०.०५ मीटर खाली जाऊन ३१८.५५ मीटरवर पोहोचले. ही चिंतेची बाब आहे. भर पावसाळ्यात ही स्थिती असेल तर पुढे काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Water shortage will continue in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.