नागपूर विभागातील जलसाठे ४८.९२ टक्के भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 09:16 PM2020-07-09T21:16:36+5:302020-07-09T21:17:55+5:30
नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह व कामठी खैरी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्प ८० टक्के भरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदा चांगला पाऊस होत असल्याने विभागातील जलसाठ्यांची स्थिती चांगली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच विभागातील मोठे प्रकल्प अर्धे भरले आहेत. यातही नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह व कामठी खैरी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्प ८० टक्के भरले आहे, हे विशेष.
नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. याची एकूण पाणीसाठवण क्षमता ३५५२.८९ दलघमी इतकी आहे. यामध्ये आजच्या तारखेला ९ जुलै रोजी १७३७.९२ दसघमी म्हणजेच ४८.९२ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. जिल्ह्यानुसार प्रकल्पांचा विचार केल्यास नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्प ७९.८५ टक्के भरला आहे. कामठी खैरी ९२.२९ टक्के, वडगाव ५५.११ टक्के, रामटेक खिंडसी १७.८८ टक्के, लोअर नांद वणा २४.४८ टक्के भरले आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह ३१.२५ टक्के, सिरपूर २३.७८ टक्के, पुजारी टोला ४५.२३ टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा २ प्रकल्प १८.८० टक्के भरले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा ८४.१२ टक्के, गडचिरोलीतील दिना प्रकल्प २५.९ टक्के भरले आहे. वर्धा जिल्ह्यातील बोर धरण ४३.१६ टक्के, धाम ४०.७३ टक्के, पोथरा २५.२९ टक्के आणि लोअर वर्धा ६४.९५ टक्के भरले आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द २२.८६ टक्के, तर बावनथडी प्रकल्प ३०.६९ टक्के भरला आहे.
मध्यम व लघु प्रकल्पांचीही स्थिती चांगली
नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांप्रमाणेच मध्यम व लघु प्रकल्पही हळूहळू भरत आहे. नागपूर विभागात एकूण ४० मध्यम प्रकल्प आहेत. त्यात आजच्या तारखेला ३५.६० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तसेच ३१४ लघु प्रकल्प असून ती आजच्या तारखेला ३२.०२ टक्के भरले.
मागील पाच वर्षात सर्वाधिक पाणीसाठा
विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास मागील पाच वर्षात आजच्याच तारखेला असलेला पाणीसाठा यंदा सर्वाधिक आहे, हे विशेष. विभागातील मोठ्या प्रकल्पांमधील एकूण पाणीसाठा क्षमता ३५५२.८९ दलघमी इतकी आहे. यात गेल्या वर्षी २०१९ मध्ये ९ जुलै रोजी २७०.१७ म्हणजे केवळ ७.६० टक्के इतके पाणी होते. २०१८ मध्ये ७३७.५३ दलघमी, २०१७ मध्ये ३६२.५० टक्के, २०१६ मध्ये ८४४.३८ टक्के आणि २०१५ मध्ये ९४१.५ टक्के इतका पाणीसाठा होता.