पाणीपुरवठा वाढला पण वसुली केव्हा वाढणार!
By admin | Published: August 31, 2015 02:47 AM2015-08-31T02:47:17+5:302015-08-31T02:47:17+5:30
शहरातील अनेक वस्त्यांत आजही पाणीटंचाई आहे. या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. काही वस्त्यांना दिवसाआड पाणी मिळते.
महापालिका : सात लाख लोकांच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा
नागपूर : शहरातील अनेक वस्त्यांत आजही पाणीटंचाई आहे. या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. काही वस्त्यांना दिवसाआड पाणी मिळते. असे असूनही शहरातील सात लाख लोकांना पूर्वीच्या तुलनेत आता व्यवस्थित पाणीपुरवठा होत असल्याचा दावा आॅरेंज सिटी वॉटर वर्क्स(ओसीडब्ल्यू)कंपनीने केला आहे.
शहरातील शंभराहून अधिक वस्त्यांना काही वर्षांपूर्वी दिवसाआड पाणी मिळत होते. आता या वस्त्यांना दररोज पाणीपुरवठा होत आहे. परंतु वसुलीचा विचार करता पाणीकरापासून १२५ कोटींचे उत्पन्न अपेक्षित असताना मनपाला यापासून वर्षाला ९० कोटी मिळत आहे.
पाणी बिलाच्या वसुलीकडे लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. यात ५० हजार अवैध नळजोडण्या नियमित के ल्या जाणार आहेत. यासाठी जुलै महिन्यात मोहीम राबविण्यात आली. परंतु याला लोकांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.
ओसीडब्ल्यूने तीन वर्षांपूर्वी शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी पाण्याची गुणवत्ता ७९ टक्के होती. आता ती ९५ टक्क्यांवर गेली आहे. पाण्याची गळती रोखण्यात यश आल्याचा दावा ओसीडब्ल्यूचे उपसंचालक राजेश कालरा यांनी केला आहे. गळती कमी झाल्यानेच पाण्याची गुणवत्ता वाढली आहे. ज्या भागात पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत त्या वस्त्यांना पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)