वर्षभरात नागपूर शहरात २४ तास पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 10:50 PM2019-11-26T22:50:41+5:302019-11-26T22:51:21+5:30

डिसेंबर २०२० पर्र्यंत नागपूर शहरातील सर्व भागाला २४ तास पाणीपुरवठा केला जाईल. सोबतच शहराला टँकरमुक्त करू, असा विश्वास जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी मंगळवारी व्यक्त केला.

Water supply in Nagpur city for 24 hours a year | वर्षभरात नागपूर शहरात २४ तास पाणीपुरवठा

वर्षभरात नागपूर शहरात २४ तास पाणीपुरवठा

Next
ठळक मुद्देजलप्रदाय समितीला विश्वास : शहराला टँकरमुक्त करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या २४ बाय ७ योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. परंतु काही ठिकाणी काम करताना अडचणी येत आहे. या अडचणींवर मात करून डिसेंबर २०२० पर्र्यंत नागपूर शहरातील सर्व भागाला २४ तास पाणीपुरवठा केला जाईल. सोबतच शहराला टँकरमुक्त करू, असा विश्वास जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी मंगळवारी व्यक्त केला. महापालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात जलप्रदाय समितीच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
पहिल्या टप्प्यात शहरातील ठराविक भागात २४ बाय ४ योजना राबविण्यात आली. काही भागात नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर काही ठिकाणी काम करताना अडचणी आल्या. यामुळे कामाला विलंब झाला. याचा परिणाम प्रकल्पाच्या कामावर झाला. कामाची गती वाढवून वर्षभरात संपूर्ण शहराला २४ तास पाणी उपलब्ध करण्यात येईल. या दृष्टीने काम सुरू असल्याची माहिती झलके यांनी दिली.
बैठकीला समिती उपसभापती भगवान मेंढे, झोन सभापती समिता चकोले, राजकुमार साहू, विरंका भिवगडे, गार्गी चोपरा, समिती सदस्य संजय महाजन, दीपक चौधरी, भुट्टो जुल्फेकार अहमद, वैशाली नारनवरे, अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, ओसीडब्ल्यूचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय रॉय, संचालक एचआर आणि जनसंपर्क केएमपी सिंग, संचालक राजेश कारला प्रामुख्याने उपस्थित होते.
शहरातील पाणीपुरवठा संबंधीचा झोननिहाय आढावा घेतला. हुडकेश्वर नरसाळा भागात पाणीपुरवठा व नळ जोडणीची माहिती घेतली. या भागात आतापर्यंत ओसीडब्ल्यूने किती कामे केली, किती नागरिकांना नळ जोडणी देण्यात आली, याबाबतचा अहवाल समितीच्या पुढील बैठकीत सादर करा, जलवाहिनीच्या कामासाठी वा दुरुस्तीसाठी खोदण्यात आलेले खड्डे तातडीने बुजवण्याचे निर्देश झलके यांनी दिले. समिता चकोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
धंतोली झोनअंतर्गत काही वस्त्यांमध्ये मीटर चोरून जाण्याची तक्रारी मोठ्या प्रमाणावर असल्याची तक्रार शिष्टमंडळाने केली.
मीटर चोरीच्या तक्रारी असेल तर यासंदभांत पोलिसात गुन्हा दाखल करा, गांधीबाग झोनमधील पाणीपट्टीची थकबाकी वसूल करा, थकबाकी न भरणाऱ्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले. जलप्रदाय विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या गणेशोत्सव देखावा स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या तीन गणेशोत्सव मंडळांना बक्षीस वितरण करण्याचा कार्यक्रम महापौर कक्षात घ्यावा, अशी सूचना झलके यांनी केली.

अमृत योजनेमुळे शहर टँकरमुक्त होईल
अमृत योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ऑगस्ट २०२० पर्यत या योजनेचे काम पूर्ण होईल, असे बॅनर्जी यांनी सांगितले. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील ५० विहिरींवर आरओ युनिट लावण्यात येणार असल्याची त्यांनी दिली. दहा झोनमधील पाच अशा ५० विहिरी निवडल्या आहे. यामध्ये आरओ युनिट लावून त्यावर वॉटर एटीएम बसविण्यात येणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.

अल्ट्रासॉनिक फ्लो मीटर बसविणार
नवेगाव व पेंच जलाशयातून उचल केलेल्या पाण्याची कुठे गळती होते याचे निदान लवकर होत नाही. अशा अडचणी लक्षात याव्या, याकरिता अल्ट्रासॉनिक फ्लो मीटर लावण्यात येणार असल्याची माहिती पिंटू झलके यांनी दिली.

Web Title: Water supply in Nagpur city for 24 hours a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.