नागपूर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठ्याची कामे वांध्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:34 AM2019-01-14T11:34:31+5:302019-01-14T11:36:09+5:30
खनिकर्म विभागाकडून खनिज निधी देण्यात टाळाटाळ होत असल्याने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाची ९८ कामे वांध्यात आली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खनिकर्म विभागाकडून खनिज निधी देण्यात टाळाटाळ होत असल्याने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाची ९८ कामे वांध्यात आली आहेत. हा निधी जवळपास सात कोटीच्या वर असून, जिल्हा परिषदेने ९८ कामाच्या निविदाही काढल्या आहेत. निधी उपलब्ध झाला नसल्याने काम करणाऱ्या कंत्राटदारांचा जीव टांगणीला लागला आहे.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा परिषदेअंतर्गत पाणी टंचाईची कामे वेगाने व्हावी, यासाठी त्यांनी एका संयुक्त बैठकीत खनिकर्म विभागाला ८ कोटी ६२ लाख ९७ हजार ३५२ रुपयांचा निधी ९८ कामांसाठी देण्याचे सुचविले होते़ त्यानंतर तडकाफडकी १ कोटी ५२ लाख ४३ हजार ८८१ रुपयांचा निधी देण्यात आला़ पालकमंत्र्यांचा आदेश असल्याने जिल्हा परिषदेने ९८ कामांची निविदा काढून प्रत्यक्षात कामेही सुरू केली़ परंतु, आता निधीच खनिकर्म विभाग देत नसल्याने कंत्राटदारांच्या जीवात जीव उरला नाही़ काहींनी निधीसंदर्भात कार्यकारी अभियंता आणि अध्यक्षा निशा सावरकर यांची भेट घेतली़ त्यांना सर्व तपशील सांगण्यात आला़ परंतु, सकारात्मक निर्णय नसल्याने ९८ कामांचे भवितव्यच संकटात सापडले आहे़
जिल्हा परिषदेतून निधी मागणीचा प्रस्ताव खनिकर्मला गेल्यानंतर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे ही फाईल गेली़ त्यांनी जिल्हा परिषद आणि खनिकर्म विभागाने चर्चा करा असे लिहून प्रस्ताव राखून ठेवला आहे़ आठवड्याभरात यावर निर्णय न झाल्यास पाणी टंचाईसाठीच्या निमार्णाधीन योजना धोक्यात येण्याची शक्यता आहे़