जलयुक्त शिवार ठरतेय काटोल, नरखेडसाठी वरदान

By admin | Published: May 18, 2017 02:32 AM2017-05-18T02:32:04+5:302017-05-18T02:32:04+5:30

लोकसहभागातून राबविल्या जात असलेल्या जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाण्याची पातळी वाढण्यात मदत होत आहे.

Water tablets are set for Katol and Narkhed boards | जलयुक्त शिवार ठरतेय काटोल, नरखेडसाठी वरदान

जलयुक्त शिवार ठरतेय काटोल, नरखेडसाठी वरदान

Next

लोकसहभागातून वाढली पाण्याची पातळी : शेतकऱ्यांना होतोय फायदा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसहभागातून राबविल्या जात असलेल्या जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाण्याची पातळी वाढण्यात मदत होत आहे. डार्क झोनमध्ये असलेला काटोल-नरखेड तालुका यासाठी राज्यात मॉडेल म्हणून पुढे येत असल्याचे चित्र आहे. नरखेड तालुक्यातील सावरगाव, तापनी आणि सीपीखापा येथील जलयुक्त शिवारअंतर्गत सुरू असलेल्या काही कामांची बुधवारी प्रत्यक्ष पाहणी केली असता ही बाब निदर्शनास आली आहे.
सावरगाव येथील लांडगी नदीवर एक जुना कोल्हापुरी बंधारा आहे. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने बंधाऱ्याचे दरवाजेही चोरीला गेले होते. शेतकऱ्यांना त्याचा कुठलाही लाभ होत नव्हता. जलयुक्त शिवार अंतर्गत या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर आहे. यासोबतच नाला खोलीकरणही करण्यात आले आहे. या बंधाऱ्याची लांबी एकूण ९२० मीटर आहे. तर उंची ३.५० मीटर इतकी आहे. चार मीटरपर्यंत नाला खोलीकरण करण्यात आले आहे. या बंधाऱ्यामुळे जवळपास ३० हेक्टरपर्यंतच्या शेताला लाभ होणार आहे.
त्याचप्रकारे सिमेंट नाला बंधाऱ्याच्या कामामुळे सुद्धा प्रचंड लाभ होत आहे. ओमप्रकाश रेवतकर या शेतकऱ्याच्या शेताजवळ तीन सिमेंट बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच नाला खोलीकरणही झाले आहे. यापूर्वी हा नाला केवळ नावालाच होता. ७५० मीटर लांब असलेला या बंधाऱ्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी जवळपास १५ मीटरने वाढली आहे. परिसरातील शेतामधील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे. तसेच २७ हेक्टर संरक्षित सिंचनासाठी उपलब्ध झाले आहे.

कामाची गती कायम ठेवण्याचा प्रयत्न
जलयुक्त शिवारअंतर्गत काटोल व नरखेड तालुक्यात चांगले काम सुरु आहे. मी येथे येण्यापूर्वीपासून चांगली कामे सुरू आहेत. या कामांची गती अशीच सुरू ठेवण्याचा आपला प्रयत्न आहे. या योजनेमुळे येथील भूजल पातळी वाढली असून शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. यातच आता गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही चांगली योजना आली आहे. यालाही शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- डॉ. अर्चना पठारे, उपविभागीय अधिकारी, काटोल
पाणीपुरवठा योजना पुन्हा कार्यान्वित
येथील पाणी पुरवठा योजना होती. पाण्याची पातळी खालावल्यामुळे ती जवळपास बंद अवस्थेत होती. परंतु सिमेंट बंधारा झाल्याने परिसरातील पाण्याची पातळी वाढली. त्याचा फायदा पाणीपुरवठा योजनेलाही झाला ही योजना पुन्हा कार्यान्वित झाली आहे. इतकेच नव्हे तर बंधारा परिसरातील १३ शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाण्याची पातळी सुद्धा ३ फुटापर्यंत वाढली आहे.
- पी.एस. खोब्रागडे, उप अभियंता, लघुसिंचन विभाग

तर द्राक्षबागा नष्ट झाल्या असत्या
जलयुक्त शिवारअंतर्गत सिमेंट बंधाऱ्याचे काम सुरू झाल्याने आम्हा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. हा बंधारा बनल्यामुळे परिसरातील शेतातील विहिरींना पाणी आले आहे. उन्हाळ्यातही पाणी राहते. हा बंधारा झाला नसता तर द्राक्षबाग नष्ट झाली असती. - ओमप्रकाश रेवतकर, शेतकरी, सावरगाव

Web Title: Water tablets are set for Katol and Narkhed boards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.