नागपुरात मैदानासाठी पाण्याची टाकी ‘कुर्बान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 10:12 AM2019-05-20T10:12:10+5:302019-05-20T10:14:18+5:30
आचारसंहितेच्या काळात टाकीच्या कामाचे भूमिपुजन होऊन खोदकामालाही सुरुवात झाली. पण टाकी ज्या मैदानात बांधण्यात येत आहे ते मैदान परिसरातील सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाचे स्थळ असल्याने मैदान वाचविण्यासाठी पाण्याच्या टाकीला विरोध होत होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्व आणि दक्षिण नागपूरच्या मधात पवनसूतनगरातील हनुमान मंदिर परिसरात पाण्याची टाकी मंजूर करण्यात आली. आचारसंहितेच्या काळात टाकीच्या कामाचे भूमिपुजन होऊन खोदकामालाही सुरुवात झाली. पण टाकी ज्या मैदानात बांधण्यात येत आहे ते मैदान परिसरातील सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाचे स्थळ असल्याने मैदान वाचविण्यासाठी पाण्याच्या टाकीला विरोध होत होत आहे. शिवसेनेने हा विषय प्रतिष्ठेचा केला आहे.
मनपा नेहरूनगर झोनअंतर्गत न्यू डायमंडनगर, न्यू गाडगेबाबानगर, भाग्यश्रीनगर, गाडगेनगर, डायमंडनगर, चिटणीसनगर, पवनसूतनगर, मित्रविहारनगर या वस्त्यांमध्ये अनेक वर्षांपासून पाण्याची भीषण समस्या आहे. पाण्याच्या टँकरसाठी नागरिकांना दररोज सकाळी नगरसेवकांच्या दारापुढे रांगेत उभे राहावे लागते, रजिस्टरमध्ये नोंद करावी लागते. त्यामुळे या भागात पाण्याची टाकी उभारून परिसरातील नागरिकांचा त्रास कमी व्हावा, या उद्देशातून भाजपा आमदाराच्या प्रयत्नातून पाण्याची टाकी मंजूर करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार आचारसंहितेच्या काळात कामाचे भूमिपूजन करून पवनसूतनगरातील हनुमान मंदिराच्या मैदानात खोदकाम सुरू करण्यात आले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केल्याने ठेकेदाराने पोलिसांच्या बंदोबस्तात काम केले. मात्र गेल्या काही दिवसांपासून काम बंद पडले आहे.
मैदानात होणाऱ्या कार्यक्रमासाठी टाकीच्या बांधकामाला शिवसेनेने विरोध केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पाणीटंचाई परिसरातील नागरिकांना भेडसावत असताना शिवसेनेचे धोरण योग्य नसल्याचेही मत काही लोकांनी व्यक्त केले. दरम्यान काम बंद राहिल्यास पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचून खड्डा धोकादायक ठरणार आहे.
मैदान वाचले पाहिजे ही आमची भूमिका आहे
टाकीच्या बांधकामाला विरोध करणाऱ्या शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक किशोर कुमेरिया यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की या मैदानात चार मंदिर आहे. हे मैदान परिसरातील नागरिकांसाठी मध्यवर्ती मैदान आहे. सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम येथे होतात. पाण्याच्या टाकीला आमचा विरोध नाही. टाकीमध्ये मैदानाचा बहुतांश भाग जातो आहे. मैदान वाचले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. पण स्थानिक लोकप्रतिनिधींशी मनपाने समन्वयाची भूमिका ठेवली नाही. आम्ही टाकीसाठी मंदिर शिफ्ट करायला तयार आहे. मी तसा दीड वर्षांपूर्वी टाकीच्या बांधकामावर आक्षेपही घेतला आहे. बाजूलाच गाडगेनगरचे ३.५ एकरचे मैदान आहे. तिथेही ही टाकी शिफ्ट करता येऊ शकते. पण प्रशासन आपल्या भूमिकेवर ताठ असून, शिवसेनाही मैदान वाचविण्यासाठी कुठलीही तडजोड करणार नाही.
तांत्रिक कारणामुळे टाकी मैदानातच उभारण्यात आली
यासंदर्भात स्थानिक भाजपाच्या नगरसेविका रेखा साकोरे यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या की, पाण्याची टाकी बनल्यास परिसरातील लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटेल. ही टाकी गाडगेनगरच्या मैदानात उभारण्यात यावी, असाही प्रस्ताव होता. पण मनपाच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक कारण सांगितल्यामुळे टाकी पवनसूतनगरच्या मैदानातच उभारण्यात आली. टाकीचे बांधकाम बंद असल्याचे लोकांकडून मला माहिती पडले आहे.