नागपुरात रेल्वे रुळावर चढले भरधाव पाण्याचे टँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 10:22 PM2019-03-27T22:22:36+5:302019-03-27T22:23:23+5:30
पाण्याचे टँकर बुधवारी अनियंत्रित होऊन इतवारी-नागभीड रेल्वे लाईनच्या बाजूने जात असताना रेल्वे रुळावर चढले. टँकरचा टायर अचानक फुटल्यामुळे चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले. यावेळी इतवारी-नागभीड पॅसेंजर बाजूच्या स्थानकावर उभी होती. टँकर रुळावर चढले त्यावेळी ही गाडी आली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. रेल्वे सुरक्षा दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून टँकर चालकास ताब्यात घेतले. त्यानंतर दुसऱ्या एका टँकरच्या साह्याने रुळावर अडकलेल्या टँकरला बाहेर काढण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाण्याचे टँकर बुधवारी अनियंत्रित होऊन इतवारी-नागभीड रेल्वे लाईनच्या बाजूने जात असताना रेल्वे रुळावर चढले. टँकरचा टायर अचानक फुटल्यामुळे चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले. यावेळी इतवारी-नागभीड पॅसेंजर बाजूच्या स्थानकावर उभी होती. टँकर रुळावर चढले त्यावेळी ही गाडी आली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. रेल्वे सुरक्षा दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून टँकर चालकास ताब्यात घेतले. त्यानंतर दुसऱ्या एका टँकरच्या साह्याने रुळावर अडकलेल्या टँकरला बाहेर काढण्यात आले.
उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असल्यामुळे भांडेवाडीच्या पाण्याच्या टाकीवरून पारडी परिसरात पाणीपुरवठा करण्यात येतो. बुधवारी घडलेल्या घटनेत एक टँकर एकतानगरात पाणीपुरवठा करून परत येत होते. पारडी परिसरातून पाण्याच्या टाकीकडे जात असताना रेल्वे रुळाच्या बाजूच्या कच्च्या रस्त्याने भांडेवाडी रेल्वे क्रॉसिंग ओलांडावी लागते. घटनेच्या वेळी भांडेवाडी परिसरातील भोलेनगर येथील रहिवासी टँकरचालक आर. हेडाऊ (४९) रेल्वे क्रॉसिंगकडे येत होता. तेवढ्यात अचानक टँकरचा पुढील टायर फुटला. यामुळे चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले. ब्रेक मारण्याऐवजी एक्सलेटर दाबल्यामुळे टँकर रुळ ओलांडून लहान भिंतीवर जाऊन आदळले. टँकरचा काही भाग रुळाच्या मध्यभागी अडकल्यामुळे चालक घाबरून तेथून पळून गेला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. येथून जाणाऱ्या इतवारी-नागभीड पॅसेंजरला काही वेळासाठी रोखून धरण्यात आले. एका दुसऱ्या टँकरच्या मदतीने अडकलेले टँकर रुळावरून काढण्यात आले. हे पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. रेल्वे सुरक्षा दलाचे इतवारी येथील प्रभारी निरीक्षक पी. एल. विश्वकर्मा, उपनिरीक्षक टेंभुर्णीकर यांनी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास रेल्वे न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने टँकर चालकास दोन हजार रुपये दंड सुनावला.