नागपुरातील बाजारात लागणार वॉटर वेंडिंग मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 02:23 PM2018-02-28T14:23:45+5:302018-02-28T14:24:02+5:30
शहरातील नेताजी मार्केट व मंगळवारी बाजारात सौर ऊर्जेवर आधारित इको फ्रेन्डली वॉटर वेंडिंग मशीन प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याच्या प्रस्तावाला सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील नेताजी मार्केट व मंगळवारी बाजारात सौर ऊर्जेवर आधारित इको फ्रेन्डली वॉटर वेंडिंग मशीन प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याच्या प्रस्तावाला सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
या मशीन ज्या ठिकाणी लावण्यात तेथील कंपनीला त्याचे भाडे रेडिरेकनरच्या आधारावर द्यावे लागेल. या मशीनसाठी एक चौरस मीटर जागेची गरज भासणार आहे. एडवेल इंडिया गु्रपने बाजार विभागाच्या सहायक आयुक्तांकडे याचे सादरीकरण क रून मशीन लावण्याचा प्रस्ताव दिला होता. बाजारात येणाऱ्या नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नाही. परंतु मशीनच्या माध्यमातून दोन रुपये ग्लास प्रमाणे पाणी मिळणार आहे. पाणी कंपनीतर्फे पाणी शुद्धीकरण करण्यात येईल. ११ महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविला जाणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी दिली.
डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनिया यासारख्या आजारांना आळा घालण्यासाठी महापालिकेने उपनियम तयार केले आहेत. त्यानुसार डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित घरमालकांना नोटीस बजावून अशी स्थळे नष्ट करण्याची सूचना देण्यात येईल. त्यानंतरही डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आल्यास १०० ते ५०० रुपयापर्यंत दंड आकारला जाणार आहे. त्यानंतरही उपाययोजना न केल्यास दररोज २० ते २०० रुपये दंड आकारण्याच्या प्रस्तावाला समितीने मंजुरी दिली.
सभागृहाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. शासन मंजुरीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.