२४ तासांपूर्वी सूचना देऊनच धरणातील पाणी सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 12:10 AM2021-07-29T00:10:29+5:302021-07-29T00:11:03+5:30
मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतून वाहणाऱ्या प्रमुख नद्यांच्या पुरामुळे महाराष्ट्रात होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी चौराई, बावनथडी तसेच संजय सरोवर या प्रमुख प्रकल्पामधून पाणी सोडण्याअगोदर चोवीस तासांपूर्वी पूर्वसूचना देण्यात येईल. आंतरराज्य समन्वय समितीची बैठक बुधवारी पार पडली. यात यासंबंधीचे नियोजन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतून वाहणाऱ्या प्रमुख नद्यांच्या पुरामुळे महाराष्ट्रात होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी चौराई, बावनथडी तसेच संजय सरोवर या प्रमुख प्रकल्पामधून पाणी सोडण्याअगोदर चोवीस तासांपूर्वी पूर्वसूचना देण्यात येईल. आंतरराज्य समन्वय समितीची बैठक बुधवारी पार पडली. यात यासंबंधीचे नियोजन करण्यात आले.
मध्य प्रदेशातील संबंधित जिल्ह्याचे जिल्हा प्रशासन तसेच नागपूर, गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्हा प्रशासनाने समन्वय ठेवून नदीकाठावरील गावांना पूर्वसूचना देणारी यंत्रणा अधिक बळकट करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी यावेळी दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त लवंगारे-वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे जबलपूरचे विभागीय आयुक्त बी. चंद्रशेखर, तेलंगणा येथील कालेश्वर प्रकल्पाचे मुख्य अभियंता तिरुपती राव, नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी तसेच छिंदवाडा, सिवनी, बालाघाट या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, वैनगंगा नदी खोऱ्याचे प्रशासक तथा अधीक्षक अभियंता जे.जी. गवई, चंद्रपूरचे अधीक्षक अभियंता पी.एन. पाटील, भंडाऱ्याचे आय.जी. पराते. नागपूरचे अंकुर देसाई व सहारे आदी यावेळी उपस्थित होते.
वैनगंगा, वर्धा व त्यांच्या उपनद्यांमुळे नागपूर विभागात पुराचा धोका निर्माण होत असून या नद्यांवरील प्रकल्पातून अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येते. पुराचे पाणी सोडताना मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांमध्ये कायमस्वरूपी समन्वयाची आवश्यकता आहे. त्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी पुराच्या धोकापातळीच्या परिस्थितीनुसार जनतेला सतर्क करावे. तसेच इतर जिल्हाधिकाऱ्यांनीही याबाबत संबंधितांना पूर्वसूचना द्याव्यात.
अतिवृष्टीच्या काळात दोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांनी थेट संपर्क करावा व त्यानुसार पूर परिस्थितीची माहिती जिल्हा प्रशासनासोबतच बाधित गावांपर्यंत पोहोचवावी. यासाठी केंद्रीय जल आयोग, जलसंपदा व संबंधित यंत्रणांमध्ये अधिक समन्वय ठेवून पूर परिस्थितीबाबतची पूर्वसूचना चोवीस तासांपूर्वी देण्याची यंत्रणा अधिक सक्षम करावी, असे निर्देशही विभागीय आयुक्तांनी दिले.
असे ठरले नियोजन
- पुरामुळे होणारी हानी टाळण्यासाठी संपर्क यंत्रणा बळकट करा
- नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू ठेवण्याचे आदेश
- मध्य प्रदेश, केंद्रीय जल आयोग व जलसंपदा समन्वय ठेवणार
-बावनथडी व चौराई या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात दैनंदिन पडणाऱ्या पावसाची माहितीसुद्धा दोन्ही राज्यांनी एकमेकांना कळवावी.
-अतिवृष्टीच्या सूचनेसंदर्भातील संपूर्ण माहिती दर तासाला मिळावी.