गोदावरी-वैनगंगेच्या खोऱ्यातून पाणी पोहोचणार तापी-पूर्णेच्या खोऱ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 06:59 AM2021-02-04T06:59:20+5:302021-02-04T06:59:47+5:30
Water News : केंद्र सरकारच्या नदीजोड प्रकल्पांतर्गत विदर्भातील वैनगंगा- नळगंगा हा प्रकल्प मंजूर झाला आहे.
- गोपालकृष्ण मांडवकर
नागपूर - केंद्र सरकारच्या नदीजोड प्रकल्पांतर्गत विदर्भातील वैनगंगा- नळगंगा हा प्रकल्प मंजूर झाला आहे. पूर्व विदर्भातील गोदावरी- वैनगंगेच्या खोऱ्यातून अतिरिक्त पाणी घेऊन ते पश्चिम विदर्भातील तापी- पूर्णाच्या खोऱ्यात वळविण्याचा हा प्रकल्प आहे. अर्थात, पूर्वेचे पाणी पश्चिमेचा ४२६ किलोमीटरचा प्रवास करून विदर्भातील शेतकऱ्यांची हिरवी स्वप्ने साकारणार आहे. प्रकल्पाचा डीपीआर तीन वर्षांपासून तयार असून, आता केंद्र आणि राज्याकडून मिळणाऱ्या निधीची प्रतीक्षा आहे.
केंद्रीय जल आयोग आणि केंद्रीय जल मंत्रालयाने १९८० मध्ये देशात नदीजोड प्रकल्प आखला. त्यानंतर १७ जुलै १९८२ मध्ये प्रकल्पाच्या अभ्यासासाठी राष्ट्रीय जल विकास अभिकरणाची स्थापना केली. पुढे २००९ मध्ये राज्य सरकारने राज्यातील तीन नदीजोड प्रकल्पांचे प्रस्ताव अभिकरणाकडे पाठविले. त्यापैकी विदर्भातील वैनगंगा- नळगंगा हा प्रकल्प मान्य करण्यात आला.
नळगंगेत पोहोचणार ३७.५८ दलघमी पाणी
या योजनेसाठी गोसेखुर्द प्रकल्पातून १,७७२
दलघमी पाणी उचलले
जाणार आहे.
ते लोअर वर्धा, काटेपूर्णा
या प्रकल्पामधून मार्गातील
३९ तलावांमधून खेळवत ४२६.५४२ किलोमीटर प्रवास करीत हे पाणी नळगंगा प्रकल्पात पोहोचविण्याची योजना आहे.
सिंचन, पाणीपुरवठा योजना आणि औद्योगिक वापरानंतर ३७.५८ दलघमी पाणी नळगंगेत सोडले जाणार आहे.
नळगंगा प्रकल्पाची
साठवणूक ६९.३२ दलघमी आहे. त्यात ही भर पडल्यावर हा साठा ९८.९० दलघमीवर पोहोचणार आहे.
प्रकल्पाची व्याप्ती
वैनगंगा (नागपूर-भंडारा/पूर्व विदर्भ) ते नळगंगा (बुलडाणा/पश्चिम विदर्भ)
एकूण जिल्हे : सहा (नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा), एकूण तालुके - १५
ओलिताखाली येणारे क्षेत्र :
३ लाख ७१ हजार २७७ हेक्टर
प्रकल्पाचे आयुर्मान : १०० वर्षे २०५० पर्यंत
सिंचन क्षमता- : १६,९४० हेक्टर
चार प्रकल्प जुळणार
प्रकल्पात पूर्व आणि पश्चिम विदर्भातील चार प्रकल्प एकमेकांशी जोडले जाणार आहेत. या प्रवासात वर्धा जिल्ह्यातील निम्न वर्धा प्रकल्प (आर्वी), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्प (बार्शिटाकळी) आणि बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा (मोताळा) प्रकल्पात पाणी पोहोचणार आहे.
या मार्गामध्ये येणाऱ्या सहा जिल्ह्यांतील १५ तालुक्यांमध्ये ३५ तलाव खोदले जाणार असून, चार तलावांची क्षमता वाढविली जाणार आहे. हे पाणी या ३९ तलावांमध्ये साठवले जाणार आहे. या तलावांतून २,८७८ हेक्टर कृषिक्षेत्राला लाभ मिळणे प्रस्तावित आहे.