आग विझविण्यासाठी लवकर मिळणार पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:59 AM2017-11-12T00:59:12+5:302017-11-12T00:59:45+5:30
नागपूर शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. विकासासोबतच आग नियंत्रणाची यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. यासाठी शहराच्या विविध भागात नवीन ९७ हायड्रंट (नळखांब) उभारण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. विकासासोबतच आग नियंत्रणाची यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. यासाठी शहराच्या विविध भागात नवीन ९७ हायड्रंट (नळखांब) उभारण्यात येणार आहेत. यासाठी इतर विभागाचा १.१० कोटींचा निधी वळता करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी २० नोव्हेंबरला होणाºया महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे.
शहराच्या कोणत्याही भागात आग लागल्यास ती तातडीने विझवता यावी, यासाठी ब्रिटिशांनी १९४७ च्या सुमारास अग्निशमन विभागाचे तब्बल एक हजार हायड्रंट उभारले होेते. परंतु यातील फक्त नऊ हायड्रंट सुरू आहेत़ जलप्रदाय विभागाने नवीन हायड्रंट लावण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता़ मात्र आर्थिक परिस्थितीमुळे हा प्रस्ताव मागे पडला होता. २४ बाय ७ योजनेंतर्गत शहरात नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. परंतु या जलवाहिन्यांना हायड्रंट जोडण्यात आलेले नाही.तसेच रस्त्यांची उंची वाढल्याने जुने हायड्रंट जमिनीखाली दबले आहेत. अग्निशमन विभागाने हायड्रंट लावण्यासाठी ११६ जागा चिन्हांकित केल्या. यातील ९ हायड्रंट सुरू आहेत. तर ९७ नवीन फायर हायड्रंट लावण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
बंद असलेले व दुरुस्त करण्याजोगे असणाºया हायड्रंटच्या दुरुस्तीकरिता २ लाख ६ हजार ८३० रुपये व नवीन हायड्रंट उभारण्याकरिता १ कोटी ५ लाख ४८ हजार ८७३ इतका खर्च अपेक्षित होता़
विभागाने २०१७-१८ या आर्थिक वर्षात १ कोटी २५ लाख रुपयांची मागणी केली होती़. परंतु आर्थिक अडचणीमुळे हा निधी उपल्बध झाला नाही. त्यामुळे अन्य खात्यातून १.१० कोटीचा निधी वळता केला जाणार आहे.
आग नियंत्रणाठी हायड्रंट आवश्यक
शहरात आग लागल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळवता यावे व लवकर पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शहराच्या विविध भागात एक हजार हायड्रंट उभारण्यात आले होते़ आग विझविण्यासाठी हायड्रंटवरून पाणी उपलब्ध करून दिले जायचे़ कालांतराने नव्या वाहिन्या टाकण्यात आल्या़, मात्र त्यांना हायड्रंटशी जोडले गेले नाही तसेच नवीन हायड्रंट लावण्यात आलेले नाही. आग लागल्यास ती तातडीने नियंत्रणात यावी. यासाठी हायड्रंट उभारणे आवश्यक आहे.