‘माथा ते पायथा’अंतर्गत हाेणार पाणलाेटची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:37 AM2020-12-17T04:37:01+5:302020-12-17T04:37:01+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ‘माथा ते पायथा’ या तत्त्वास अनुसरून तालुकास्तरावर ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ‘माथा ते पायथा’ या तत्त्वास अनुसरून तालुकास्तरावर यंत्रणानिहाय कामे करावयाची असून, २०२१-२२ च्या आराखड्यात समाविष्ट करावयाची आहेत. सदर कामे पाणलोट योजनेंतर्गत होणार असून, कृषी विभागाने तालुक्यातील वरोडा व खैरी (लखमा) या ग्रामपंचायतीची निवड केली आहे.
पाणलोट क्षेत्राच्या वैज्ञानिक पद्धतीने विकास करण्यासाठी ‘माथा ते पायथा’ हा सिद्धांत बघितला जातो. त्याअनुषंगाने माथा ते पायथा या संकल्पनेतून तालुक्यातील दोन ते तीन ग्रामपंचायतीची निवड तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या यंत्रणेमार्फत करावयाची होती. तसेच निवड करण्यात आलेल्या गावात येणाऱ्या कामांना नरेगाची जोड देण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या वरोडा व खैरी (लखमा) या दोन ग्रामपंचायत क्षेत्रात प्रामुख्याने दगडी बांध, सिमेंट नाला बांध, सार्वजनिक शेततळे, नाला खोलीकरण व सरळीकरण याची कामे घेण्यात येणार आहेत. सदर योजनेची व्यापकता लक्षात घेता गावातील भूजल पातळीमध्ये वाढ होईल. गावातील मजुरांना कामाच्या मागणीची पूर्तता सुद्धा होणार आहे.
ज्या ठिकाणी पाणलोटाची कामे झालेली आहेत. त्याठिकाणी पाणलोट व्यवस्थापन योग्य राहावे अथवा त्या कामाचा दर्जा उन्नत व्हावा याकरिता कामे घेण्यासाठी ग्रामपंचायतीला ‘माथा ते पायथा’ तत्त्वावर कृषी विभागामार्फत मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
....
शासन परिपत्रकानुसार गाव समृद्ध करणे व गावांमध्ये मृदा व जलसंधारणाची कामे घेऊन गावातील भूजल पातळीमध्ये वाढ करणे हा ‘माथा ते पायथा’ या योजनेचा उद्देश आहे.
- संदीप गोडशेलवार, सहायक गटविकास अधिकारी,
पं. स. कळमेश्वर तथा गटविकास अधिकारी (नरेगा) नागपूर.
....
गावांमध्ये उपलब्ध असलेले पाणलोटाच्या कामाची पाहणी करून गावाच्या विकासासाठी कोणती कामे घेणे आवश्यक वाटतात, त्यानुसार कामाचे नियोजन करण्यात येईल.
- उमाकांत हातांगळे, तालुका कृषी अधिकारी, कळमेश्वर