फेब्रुवारीतच जलस्तरात घसरण
By admin | Published: February 28, 2015 02:20 AM2015-02-28T02:20:46+5:302015-02-28T02:20:46+5:30
नागपूर विभागातील सिंचन प्रकल्पाचा जलस्तर फेब्रुवारीच्या शेवटीच कमालीचा खाली गेल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईचा तीव्र फटका बसण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.
नागपूर : नागपूर विभागातील सिंचन प्रकल्पाचा जलस्तर फेब्रुवारीच्या शेवटीच कमालीचा खाली गेल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईचा तीव्र फटका बसण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.जलसंपदा विभागाकडील २३ फेब्रुवारीपर्यंतच्या नोंदीनुसार नागपूर विभागातील मोठ्या सिंचन प्रकल्पात एकूण क्षमतेच्या ३९ टक्के, (क्षमता ३१०९ द.ल.घ.मी, उपलब्ध साठा १२३८द.ल.घ.मी) मध्यम प्रकल्पात १८ टक्के (क्षमता ५५०.१ द.ल.घ.मी, उपलब्ध साठा ९९ द.ल.घ.मी)तर लघु प्रकल्पात (क्षमता ४८२ द.ल.घ.मी, उपलब्ध साठा ९३द.ल.घ.मी)१९ टक्के जलसाठा आहे. उन्हाळ्यात पूर्व विदर्भात तापणारे ऊन आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या टप्प्यात तापमानाने गाठलेला ३४ अंशाचा टप्पा लक्षात घेतला तर पुढच्या काळात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याचा धोका आहे.
विभागातील १६ मोठ्या प्रकल्पांपैकी नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोहमध्ये २२ टक्के, कामठी खैरीमध्ये ४७ टक्के, खिंडसीमध्ये ३४ टक्के जलसाठा आहे. विभागात ४० मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी नागपूर जिल्ह्यातील १३ प्रकल्प असून त्यात सध्या एकूण २५ टक्के जलसाठा आहे. विभागातील एकूण ३०९ प्रकल्पांपैकी नागपूर जिल्ह्यात ६१ प्रकल्प असून त्यात एकूण क्षमतेच्या फक्त २२ टक्के पाणी आहे. (प्रतिनिधी)