जलसंकट निसर्गनिर्मित नव्हे तर मानवनिर्मित
By admin | Published: May 24, 2016 02:47 AM2016-05-24T02:47:43+5:302016-05-24T02:47:43+5:30
देशातील अनेक राज्यात सध्या जलसंकट निर्माण झाले असून, पाण्याचे संकट हे निसर्गनिर्मित नसून..
गिरीश गांधी : रोहणा येथे ७० गॅबियन बंधाऱ्यांच्या कामाला प्रारंभ
काटोल : देशातील अनेक राज्यात सध्या जलसंकट निर्माण झाले असून, पाण्याचे संकट हे निसर्गनिर्मित नसून ते सुल्तानी संकट असल्याचे प्रतिपादन वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी केले. नरखेड तालुक्यातील रोहणा येथे ७० गॅबियन बंधाऱ्यांच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आ.डॉ. आशिष देशमुख, रूपाताई देशमुख, ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी, चरणसिंग ठाकूर, जिल्हा परिषद शिक्षण सभापती उकेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी अविनाश कातडे, पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे, नरखेड पंचायत समितीचे सभापती राजू हरणे, सुरेश आरघोडे, डॉ. प्रेरणा बारोकर, बबन लोहे, सुरेश खसारे, संध्या मानकर, रमेश फिस्के, इस्माईल बारुदवाले, मारोतराव बोरकर, दिलीप तिजारे, बालू ठाकूर, चंद्रशेखर देशमुख, प्रा. भाऊ भोगे यांची उपस्थिती होती.
गिरीश गांधी पुढे म्हणाले, चांगल्या पर्यावरणासाठी ३३ टक्के जमीन ही जंगलव्याप्त असायला पाहिजे. भारतात ७५ दशलक्ष हेक्टरवर घनदाट जंगल होते, जे ११० दशलक्ष हेक्टर असायला पाहिजे होते. मात्र त्यामध्ये ६० वर्षांत वाढ झाली नाही. जमिनीची धूप थांबविणे महत्त्वाचे असून पाणी कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही, हे देखील विसरता कामा नये, असे विचार मांडले.
आ.डॉ. आशिष देशमुख यांनी दरवर्षी पाण्याचा प्रश्न बिकट होत असून, महाराष्ट्रातील ३३ हजार गावांत दुष्काळ जाहीर करावा लागला. त्यामुळे आता प्रत्येक गावाला जलनीती तयार करून पाण्याचे आॅडिट करावे लागेल व गावाला किती पाणी लागेल याची माहिती करावी लागेल, असे स्पष्ट केले. माजी मंत्री रणजित देशमुख यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त काटोल व नरखेड या दोन्ही तालुक्यात ७० गॅबियन बंधारे तयार करण्याचा संकल्प करण्यात आला होता. परंतु उपविभागीय अधिकारी कातडे यांनी गावातील कर्मचारी व गावकरी यांच्या माध्यमातून ३५० व चरणसिंग ठाकूर यांनी ५० बंधारे बांधून देण्याचा संकल्प केल्याने ५०० बंधारे जुलै महिन्यापूर्वी पूर्ण करण्याचे आ.डॉ. आशिष देशमुख यांनी जाहीर केले. प्रास्ताविक दिनकर राऊत यांनी केले. संचालन प्राचार्य डॉ. विजय धोटे यांनी तर आभार उकेश चव्हाण यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)