झारखंड एसआयटी तपासासाठी महाराष्ट्राच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:08 AM2021-07-27T04:08:07+5:302021-07-27T04:08:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई/नागपूर : झारखंडमधील हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वातील झामुमो-काँग्रेस आघाडी सरकार पाडण्याच्या प्रयत्नात भाजप नेते, माजी मंत्री ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/नागपूर : झारखंडमधील हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वातील झामुमो-काँग्रेस आघाडी सरकार पाडण्याच्या प्रयत्नात भाजप नेते, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नागपूर, विदर्भातील तिघांची नावे आल्याने, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या प्रकरणाच्या चौकशीसाठी झारखंडचे विशेष तपास पथक (एसआयटी) कोणत्याही क्षणी नागपूर व मुंबईत येईल, असे वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी या पथकाला पूर्ण सहकार्य केले जाईल, असे म्हटले आहे.
दरम्यान, बावनकुळे व इतरांची दिल्लीच्या हॉटेलमधील उपस्थितीचे सीसीटीव्ही फुटेज एसआयटीच्या हाती लागले असून, बावनकुळे यांच्यासह विदर्भातील तिघांची चौकशी करण्यासाठी झारखंड एसआयटी चमू दोन दिवसांत नागपूरला पोहोचू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
झारखंडचे आघाडी सरकार पाडण्यासाठी आमदारांच्या खरेदी-विक्री प्रकरणात झारखंड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यातील पत्रकार अभिषेक दुबे यांनी रांची व दिल्लीत झालेल्या घडामोडींची कबुलीवजा माहिती पोलिसांना दिली. त्यात महाराष्ट्रातील माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (कोराडी), काटोलचे माजी नगराध्यक्ष चरणसिंग ठाकूर आणि जयकुमार बेलखोडे (कारंजा, वर्धा) यांची नावे घेतली आहेत. या तपासासाठी विशेष पथक गठीत करण्यात आले असून, सूत्रांच्या माहितीनुसार, एसआयटीकडे दिल्लीतील हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही आहे. त्यात बावणकुळे व ठाकूर यांचे १५ जुलैला हॉटेलमधील वास्तव्याला दुजारो मिळाला आहे. त्यामुळे या चौकशीसाठी एसआयटीची चमू नागपुरात कोणत्याही क्षणी धडकण्याची शक्यता आहे.
---------
चौकट...
बावनकुळे, बेलखोडे आउट ऑफ रेंज, ठाकूर यांचा दुजोरा व इन्कार
याबाबत प्रतिक्रियेसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, चंद्रशेखर बावनकुळे व जयकुमार बेलखोडे सोमवारी आउट ऑफ रेंज होते. चरणसिंग ठाकूर मात्र नागपूर-काटोलमध्येच आहेत. ‘लोकमत’शी बोलताना ठाकूर यांनी, हो १५ जुलैला दिल्लीत होतो, परंतु झारखंड सरकार पाडण्याच्या प्रकरणाशी आपला कवडीचाही संबंध नसल्याचे म्हटले. आपण दुसऱ्या कामानिमित्ताने बावनकुळे यांच्यासोबत १५ जुलैला दिल्लीत होतो. १६ जुलैला दुपारी आपण नागपुरात परत आलो.
--------------------
पूरस्थितीमुळे राज्य शोकाकूल असताना
भाजप नेते ऑपरेशन लोटसमध्ये व्यस्त - मलिक
मुंबई : झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचे सरकार पाडण्यासाठी पैसे देऊन आमदार फोडण्याचे कटकारस्थान भाजपकडून झारखंडमध्ये रचले गेले, त्यात महाराष्ट्राचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव पत्रकार अभिषेक दुबे यांनी पोलीस चौकशीत उघड केले आहे. राज्यात पूरपरिस्थितीमुळे लोक दुःखात असताना भाजपचे लोक झारखंडचे आमदार फोडण्यासाठी पैसे घेऊन जात आहेत. ही दुर्दैवी बाब असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
पैशांचा घोडेबाजार करून झारखंड सरकार पाडण्याचा डाव उघड झाला आहे. मात्र, भाजपला महाराष्ट्रात ऑपरेशन लोट्स साध्य करता येणार नाही, असेही नवाब मलिक यांनी सोमवारी ठणकावून सांगितले.
अभिषेक दुबे या पत्रकाराला झारखंडमध्ये अटक केल्यानंतर, त्याच्या पोलीस चौकशीतून हा धक्कादायक खुलासा समोर आल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
दरम्यान, हा पत्रकार तीन आमदारांशी संपर्कात होता. या आमदारांशी डील करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचा एक माजी मंत्रीही गेला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला, तसेच २१ जुलै रोजी भाजपचे महाराष्ट्रातील पदाधिकारी मोहीत कंबोज, अमित यादव, आशुतोष ठक्कर हे लोक पैसे घेऊन झारखंड येथे दाखल झाले. मात्र, पोलिसांची कुणकुण लागल्यानंतर या लोकांनी तिथून पळ काढला, असेही नवाब मलिक म्हणाले.
आमदार फोडाफोडीच्या या कार्यक्रमाची चौकशी करण्यासाठी झारखंड सरकारने एसआयटीची तीन पथके स्थापन केली असून, यापैकी एक पथक झारखंडमध्ये, तर दुसरे दिल्लीत आणि तिसरे पथक महाराष्ट्रात तपासासाठी येणार आहे. महाराष्ट्रातील दोन आमदारांचाही त्यात समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. झारखंडची एसआयटी टीम महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना पूर्ण सहकार्य केले जाईल, असेही नवाब मलिक यांनी जाहीर केले.
राज्यात पूरपरिस्थितीमुळे लोक दुःखात असताना, भाजपचे लोक झारखंडचे आमदार फोडण्यासाठी पैसे घेऊन जात आहेत. एका-एका आमदारासाठी कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखविण्यात आले. पूरपरिस्थितीत हेच पैसे लोकांच्या मदतीसाठी देता आले असते. मात्र, झारखंडचे सरकार पाडण्यासाठी भाजपची यंत्रणा काम करत आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.