नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवरील मायावतींच्या जाहीर सभेचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:48 PM2017-11-30T23:48:40+5:302017-12-01T00:03:46+5:30
बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्या जाहीर सभेचा मार्ग वाहतूक विभागाने परवानगी दिल्यामुळे मोकळा झाला आहे. ही सभा १० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता कस्तूरचंद पार्क मैदानावर होणार आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्या जाहीर सभेचा मार्ग वाहतूक विभागाने परवानगी दिल्यामुळे मोकळा झाला आहे. ही सभा १० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता कस्तूरचंद पार्क मैदानावर होणार आहे.
महानगरपालिकेच्या हेरिटेज संवर्धन समितीने २५ आॅक्टोबर रोजी सभेला परवानगी दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजकांना सात विविध विभागांचे ना हरकत प्रमाणपत्र आणण्यास सांगितले होते. त्यानंतर आयोजकांना सहा विभागांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले, पण वाहतूक विभागाने लाल झेंडी दाखवली होती. विधिमंडळ अधिवेशनासाठी शहरात येणाऱ्या अधिकाऱ्यांची वाहने पार्क करण्याकरिता कस्तूरचंद पार्कची जागा आरक्षित करण्यात आल्याचे कारण वाहतूक विभागाने सभेला अनुमती नाकारताना दिले होते. त्याविरुद्ध पक्षाचे जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने वाहतूक विभागासह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली होती. परिणामी, वाहतूक विभागाने विषय ताणून न धरता २७ नोव्हेंबर रोजी सभेला ना हरकत प्रमाणपत्र दिले. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने मूळ उद्देश पूर्ण झाल्याचे निरीक्षण नोंदवून ही याचिका गुरुवारी निकाली काढली. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. ए. व्ही. बंड यांनी बाजू मांडली.
ते परिपत्रक शेकू शकते
दक्षिण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांनी १६ नोव्हेंबर रोजी परिपत्रक जारी करून कस्तूरचंद पार्कची जागा विधिमंडळ अधिवेशनासाठी येणारी वाहने पार्क करण्याकरिता आरक्षित केली आहे. हे परिपत्रक शासनावर शेकण्याची शक्यता आहे. कस्तूरचंद पार्क हेरिटेज असून या मैदानाचे नुकसान होईल अशा कोणत्याही गोष्टी करण्यास उच्च न्यायालयाने मनाई केलेली आहे. असे असताना वाहतूक विभागाने जड वाहने पार्क करण्यासाठी कस्तूरचंद पार्क आरक्षित केले आहे. ही बाब अॅड. बंड यांनी निदर्शनास आणून दिल्यामुळे न्यायालयाने सदर परिपत्रक रेकॉर्डवर आणण्याचे निर्देश दिलेत. कस्तूरचंद पार्कच्या संवर्धनासंदर्भातील जनहित याचिकेमध्ये या परिपत्रकाची वैधता तपासली जाईल. जनहित याचिकेवर १३ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. ही याचिका न्यायालयाने स्वत:च दाखल केली असून त्यात अॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र आहेत.