सीताबर्डी मार्ग पुन्हा अतिक्रमण मुक्त : ३५ हातठेले, हॉकर्सचे साहित्य ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:46 AM2019-07-13T00:46:24+5:302019-07-13T00:47:28+5:30
शहराचा केंद्रबिंदू असलेल्या सीताबर्डीच्या मुख्य मार्गासह इतरही भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. विशेष म्हणजे, वर्षातून एक-दोन वेळा या भागात अतिक्रमणाची कारवाई होते, परंतु दुसऱ्याच दिवशी पुन्हा अतिक्रमण ‘जैसे थे’ होते. शुक्रवारी पुन्हा महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक व वाहतूक परिमंडळ, सीताबर्डीने व्हेरायटी चौक ते सीताबर्डी मार्गावरील अतिक्रमण काढले. या कारवाईत ३५ हातठेल्यांसह हॉकर्सचे साहित्य जप्त करण्यात आले. विशेषत: दुकानांचे अवैध शेडही काढण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराचा केंद्रबिंदू असलेल्या सीताबर्डीच्या मुख्य मार्गासह इतरही भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. विशेष म्हणजे, वर्षातून एक-दोन वेळा या भागात अतिक्रमणाची कारवाई होते, परंतु दुसऱ्याच दिवशी पुन्हा अतिक्रमण ‘जैसे थे’ होते. शुक्रवारी पुन्हा महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक व वाहतूक परिमंडळ, सीताबर्डीने व्हेरायटी चौक ते सीताबर्डी मार्गावरील अतिक्रमण काढले. या कारवाईत ३५ हातठेल्यांसह हॉकर्सचे साहित्य जप्त करण्यात आले. विशेषत: दुकानांचे अवैध शेडही काढण्यात आले.
सीताबर्डी मार्ग हा वर्दळीचा. २४ तास या मार्गावर सतत रहदारी सुरू असते. विशेषत: सायंकाळी वाहन व पादचाऱ्यांची होणारी गर्दी यातच फूटपाथवर व रस्त्याच्या कडेला लागलेले हातठेले व फुटकळ दुकानदारांमुळे वाहतुकीची कोंडी होते. अनेक दुकानदार आपले अर्धेअधिक साहित्य फूटपाथवर आणून विकतात. या अतिक्रमणावर कारवाई होत असली तरी त्याला गंभीरतेने घेत नसल्याने अतिक्रमण विरोधी पथकाची पाठ फिरताच पुन्हा अतिक्रमण होते. शुक्रवारी मनपाचे अतिक्रमण विरोधी पथकाचे अशोक पाटील व वाहतूक परिमंडळ, सीताबर्डीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौक ते सीताबर्डी मार्गाचे अतिक्रमण काढण्यात आले. अचानक सुरू झालेल्या या कारवाईने खळबळ उडाली. रस्त्यावर, फूटपाथवर ठेवण्यात आलेले ट्रकभर सामान जप्त करण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्याय व पोलीस उपआयुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. यावेळी ३५ अवैध हातठेले व हॉकर्सवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. यापुढेही ही कारवाई सुरू राहील, अशी माहिती भांडारकर यांनी दिली.
इमामवाडापासून ते कॅन्सर हॉस्पिटलपर्यंत कारवाई
मनपाच्या धंतोली झोनच्या अतिक्रमण विरोधी पथकाने इमामवाडा ते कॅन्सर हॉस्पिटलपर्यंत हातठेले, किरकोळ दुकानदारांवर कारवाई केली. कॅन्सर हॉस्पिटलच्या मागे असलेले एक अनधिकृत शेडही तोडण्यात आले. टीबी वॉर्डाच्या मागील भागात असलेली चहा टपरी, नाश्त्याची दुकाने, फळ विक्रेता, भाजीपाल्यांची दुकानांसह १५ अतिक्रमण काढले. सोबतच १२ अस्थायी शेड तोडण्यात आले.
पाटणकर चौक भागातील १७ अतिक्रमण काढले
अतिक्रमण विरोधी पथकाच्या मनपाच्या आसीनगर झोनच्या पथकाने पाटणकर चौक ते कामठी रिंगरोडपर्यंतचे अतिक्रमण काढले. यावेळी १७ अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई संजय कांबळे, संजय शिंगणे, भास्कर मालवे आणि त्यांच्या चमूने केली.