इच्छा तेथे मार्ग; ‘वन लेग वंडर’ अशोक मुन्ने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 10:37 AM2018-01-19T10:37:26+5:302018-01-19T10:49:24+5:30

‘वन लेग वंडर’ अशी ओळख असलेला शहरातील युवक अशोक मुन्ने याने आपल्या अपंगत्वावर मात करताना नवी उंची गाठली आहे. त्याची जीवनगाथा बघितल्यानंतर ‘इच्छा तेथे मार्ग’ याची प्रचिती येते.

The way there is the will; 'One leg wonder' Ashok Mune | इच्छा तेथे मार्ग; ‘वन लेग वंडर’ अशोक मुन्ने

इच्छा तेथे मार्ग; ‘वन लेग वंडर’ अशोक मुन्ने

Next
ठळक मुद्दे ‘अपंगत्वाचा बाऊ न करता निर्धार आणि धैर्य असेल तर अपंगत्वावर मात करता येते. निर्धार असेल तर प्रत्येक जण (ही किंवा हा) धावू शकतो.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:
 ‘वन लेग वंडर’ अशी ओळख असलेला शहरातील युवक अशोक मुन्ने याने आपल्या अपंगत्वावर मात करताना नवी उंची गाठली आहे. त्याची जीवनगाथा बघितल्यानंतर ‘इच्छा तेथे मार्ग’ याची प्रचिती येते. आता तो नागपुरात ११ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लोकमतच्या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे.
२००९ मध्ये रेल्वे अपघातात अशोकने उजवा पाय गमावला. चुकीच्या झालेल्या शस्त्रक्रियेमुळे त्याला वर्षभर बेडवर रहावे लागले. २०१२ मध्ये पुणे येथे त्याने कृत्रिम पाय लावल्यानंतर त्याच्या ‘हीरो’ बनण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. पांगळेपणामुळे अनेकदा अपयश आल्यावर सुरुवातीला तो निराश झाला पण, त्यानंतर त्याने पांगळेपणाचा बाऊ न करता लढवय्या बाणा जपताना मी कुठेही कमी नसल्याचे जगाला दाखवून दिले.
लोकमतने मॅरेथॉन आयोजनासाठी घेतलेल्या पुढाकाराबाबत बोलताना ३३ वर्षीय मुन्ने म्हणाला,‘लोकमत भव्य-दिव्य पद्धतीने मॅरेथॉनचे आयोजन करीत आहे, ही चांगली बाब आहे. यामुळे शहरातील धावपटूंसाठी नव्या आशा निर्माण होतील. लोकमतच्या अनेक कार्यक्रमात यापूर्वीही मी सहभागी झालेले आहो. हा इव्हेंटसुद्धा मोठ्या प्रमाणावर यशस्वी होईल, अशी खात्री आहे.’
मुन्ने अलीकडे कोची मॅराथॉनमध्ये सहभागी झाला होता आणि त्यापूर्वी त्याने २२ किलोमीटर सातारा हिल्स मॅरेथॉन २०१३ मध्ये पुरस्कार पटकाविला आहे.
अपंगत्वाबाबत विचारले असता प्रेरणादायी प्रवास असलेला मुन्ने म्हणाला, ‘अपंगत्वाचा बाऊ न करता निर्धार आणि धैर्य असेल तर अपंगत्वावर मात करता येते. निर्धार असेल तर प्रत्येक जण (ही किंवा हा) धावू शकतो.
मी तसा गिर्यारोहक आहे. मी चीनच्या बाजूने माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने ३५० मीटर अंतर शिल्लक असताना मला मोहीम अर्ध्यावर सोडावी लागली. त्यानंतर मी अन्य क्रीडा प्रकारात कौशल्य मिळवण्याचे ठरविले.’
जगातील सर्वांत उंच मार्ग खरदुंग ला (१८,३८० फूट) येथे बाईक राईड करणारा मुन्ने हा शारीरिकदृष्ट्या अपंग असताना अशी राईड करणारी पहिली व्यक्ती आहे, याचा प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो. तो रोज ३-४ किलोमीटर जलतरण करतो त्याचसोबत मार्शल आर्ट व योगासनाचा नियमित सराव करतो.
मुन्ने म्हणाला,‘मी नागपूर मॅरेथॉनसाठी सरावाला सुरुवात केली आहे. यापूर्वी मी रोज सकाळी ३ किलोमीटर धावण्याचा सराव करीत होतो, पण नागपूर मॅरेथॉनची घोषणा झाली तेव्हापासून या अंतरात दोन किलोमीटरची भर पडली आहे.’
नागपूर महामॅराथॉनच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुन्ने यांनी नागपूरकरांना शारीरिक स्वास्थ्यासाठी यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
मुन्ने म्हणाला,‘स्पर्धा, विजय किंवा पराभव हे सगळे वेगळे विषय आहे. मी नागपूरकरांना स्वास्थ्य राखण्यासाठी मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करीत आहे. धावणे हा स्वस्त क्रीडा प्रकार आहे. त्यासाठी महागड्या साहित्याची गरज नाही. प्रत्येकाला परडवणाऱ्या खर्चात या क्रीडा प्रकाराची हौस भागविता येते. लोकमतने नागपूरकरांना मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.’
मुन्नेच्या जीवनातून प्रेरणा व धैर्य याचा वस्तुपाठ घेण्यासारखा आहे. केवळ आपल्या कमकुवतपणावर मात न करता ‘इच्छा तेथे मार्ग’ याची प्रचिती देणारे त्याचे जीवन आहे.

Web Title: The way there is the will; 'One leg wonder' Ashok Mune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.