वेकोलिचा क्रशर ठरतोय ‘पांढरा हत्ती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:02 AM2018-08-24T00:02:02+5:302018-08-24T00:04:05+5:30
गोकुल खाण येथे तब्बल ३० लाख रुपयांचा निधी खर्च करीत क्रशर मशीन उभी करण्यात आली. साधारणत: वर्षभरापूर्वी या मशीनचे काम आणि बांधकाम सुरू करण्यात आले. कालावधीनुसार या क्रशर मशीनचे काम पूर्णत्वास येत, यावर कोळसा प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे होती. परंतु वेकोलि अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि आपसी भांडखोर प्रवृत्तीमुळे ३० लाख रुपयांची ही क्रशर यंत्रणा ‘पांढरा हत्ती’ ठरत आहे.
अभय लांजेवार/राम वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोकुल खाण येथे तब्बल ३० लाख रुपयांचा निधी खर्च करीत क्रशर मशीन उभी करण्यात आली. साधारणत: वर्षभरापूर्वी या मशीनचे काम आणि बांधकाम सुरू करण्यात आले. कालावधीनुसार या क्रशर मशीनचे काम पूर्णत्वास येत, यावर कोळसा प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे होती. परंतु वेकोलि अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि आपसी भांडखोर प्रवृत्तीमुळे ३० लाख रुपयांची ही क्रशर यंत्रणा ‘पांढरा हत्ती’ ठरत आहे.
गोकुल खाणीत स्टॉक क्रमांक २ वर सदर क्रशर मशीनचे बांधकाम करण्यात आले आहे. विशेषत: कोळसा उत्खनन करून बाहेर काढला जातो. त्यानंतर या क्रशरमध्ये प्रक्रिया केली जाते. हा कोळसा वीज प्रकल्पांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. बऱ्याचदा प्रक्रिया न करताच कोळसा थेट या प्रकल्पांसाठी रवानाही केला जातो, असा आरोपही केल्या जात आहे.
ज्या गोकुल खाणीत वेकोलिच्याच महिला कर्मीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. ‘त्या’ खाणीच्या वेकोलि अधिकाºयांचे नेमके लक्ष कोणत्या बाबींकडे आहे, हीसुद्धा बाब या प्रकरणावरून अधोरेखित करणारी ठरत आहे. वेकोलिने पाण्यासारखा पैसा ज्या क्रशर मशीनसाठी ओतला, ती सध्या धूळखात, नादुरुस्तीच्या कैचीत अडकली आहे. अनेकदा या क्रशर मशीनची चाचपणीसुद्धा करण्यात आली. उमरेडचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक एम. के. मजुमदार यांच्या देखरेखीत हे काम चालले. अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी यामध्ये यश आले नाही, असाही ठपका ठेवल्या जात आहे. यामुळे सध्या एका खासगी कंपनीचे क्रशर गोकुल खाणीत सुरू आहे. खासगी कंत्राटदाराच्या क्रशरचे मीटर सुरू असल्याने वेस्टर्न कोल फील्डस् लिमिटेड कंपनीला अधिकचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
या प्रकरणाबाबत गोकुल खाणीचे प्रभारी खाण प्रबंधक रवींद्र खेडकर यांच्याशी चर्चा केली असता, मी या ठिकाणी नवीन आहे. मला फारसे माहीत नाही. खासगी कंपनीच्या क्रशरला किती रक्कम दिली जाते, याबाबतही मला माहिती नाही. पाहून सांगतो. वेळ लागेल, असे म्हणत अधिक बोलण्याचे टाळले. काळ्या कोळशाने काळवंडलेल्या वेकोलि अधिकाऱ्यांच्या ‘काला पत्थर’च्या बऱ्याच बाबी आता चव्हाट्यावर येत असल्याने वेकोलिची प्रशासकीय यंत्रणा सावरासावर करण्याच्या मार्गी लागली आहे.
आपसात मतभेद
गोकुल खाण येथे सुमारे ११ महिन्यांपासून जी. एस. राव खाण प्रबंधक पदावर कार्यरत आहे. याच ठिकाणी आठ महिन्यांपासून रवींद्र खेडकर सुरक्षा अधिकारी या पदावर आहेत. सुरक्षा अधिकारी म्हणून काही नोंदी तयार करून पाठविल्यानंतरही वरिष्ठ अधिकारी योग्य प्रतिसाद देत नाही, हे दुखणे अनेकदा खेडकर यांनी वरिष्ठांकडे मांडले आहे. दुसरीकडे जी. एस. राव यांच्याबाबतही अनेकदा तक्रारी झालेल्या आहेत. केवळ ११ महिन्यात दोन ते तीनदा राव यांची बदली झाल्याचे समजते. दोघांच्याही आरोप-प्रत्यारोपांच्या पत्रांचा गठ्ठा वेकोलिचे अध्यक्ष, सहप्रबंध निदेशक राजीवरंजन मिश्रा आणि उमरेडचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक एम. के. मजुमदार यांच्याकडे अनेकदा पोहोचला आहे. दोघांच्याही आपसी मतभेदामुळे खाणीमधील सुरक्षा यंत्रणा आणि संपूर्ण नियोजन कोलडमले होते, असा आरोप कामगार वर्गातून होत आहे. या दोन प्रमुख अधिकाऱ्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या भानगडींमुळे गोकुल खाणीमधील महत्त्वपूर्ण बाबींवर दुर्लक्षच झाले. किमान सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार की नाही, असा सवाल विचारला जात आहे.