नागपूर जिल्ह्यात वेकोली अधिकाऱ्यांनी कापसाचे उभे पीक कापून बनवला रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 10:35 AM2018-01-17T10:35:54+5:302018-01-17T10:40:02+5:30
वेकोलिच्या सिल्लेवाडा (ता. सावनेर) सब एरिया कार्यालयांतर्गत भानेगाव (ता. सावनेर) खुल्या कोळसा खाणीचे (ओपन कास्ट माईन) काम सुरू केले आहे. या खाणीपर्यंत जाण्यासाठी रस्ता हवा असल्याने वेकोलि अधिकाऱ्यांनी कपाशीच्या शेतात जेसीबी चालवून रस्ता तयार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेकोलिच्या सिल्लेवाडा (ता. सावनेर) सब एरिया कार्यालयांतर्गत भानेगाव (ता. सावनेर) खुल्या कोळसा खाणीचे (ओपन कास्ट माईन) काम सुरू केले आहे. या खाणीपर्यंत जाण्यासाठी रस्ता हवा असल्याने वेकोलि अधिकाऱ्यांनी भानेगाव शिवारातील शेतकऱ्याच्या कपाशीच्या शेतात जेसीबी चालवून बळजबरीने रस्ता तयार केला. हा प्रकार लक्षात येताच शेतकऱ्याने याला विरोध करीत सदर काम बंद पाडले. तरीही यात शेतकऱ्याचे किमान ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. हा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. विशेष म्हणजे, याबाबत वेकोलि प्रशासनाने संबंधित शेतकऱ्याला कोणतीही लेखी अथवा तोंडी पूर्वसूचना दिली नव्हती. वेकोलि अधिकाऱ्यांच्या या करंटेपणामुळे परिसरातील शेतकऱ्यांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
वेकोलि प्रशासनाने भानेगाव परिसरात कोळशाच्या खुल्या खाणीच्या कमाला सुरुवात केली आहे. या खाणीसाठी भानेगाव परिसरातील १३१.९० हेक्टर शेतीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. वेकोलि प्रशासनाने ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहित केल्या आहेत, त्यातील बहुतांश शेतकऱ्यांसोबत शासकीय नियमानुसार करारनामा केला आहे. यातील काही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचा मोबदला देण्यात आला असून, काही प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना नोकरीही दिली आहे.
देवराव ढोके, रा. भानेगाव, ता. सावनेर यांची भानेगाव शिवारात साडेतीन एकर शेती आहे. वेकोलि प्रशासनाने ढोके यांचीही शेती कोळसा खाणीसाठी अधिग्रहित केली आहे. वेकोलिने त्यांच्यासोबतही नियमानुसार करारनामा केला. परंतु, त्यांना त्यांच्या शेतजमिनीचा मोबदला अद्यापही देण्यात आला नाही. शिवाय, त्यांच्या वारसांना वेकोलित नोकरीही देण्यात आली नाही. उपजीविकेचे शेतीव्यतिरिक्त दुसरे कोणतेही साधन नसल्याने ढोके यांनी त्यांच्या मालकीच्या शेतीवरील ताबा सोडला नाही. परिणामी, देवराव ढोके यांनी यावर्षी साडेतीन एकर शेतात कपाशीची लागवड केली.
आधी मोबदला द्यावा
वेकोलि प्रशासनाने खुल्या कोळसा खाणीसाठी आपली शेती २००७ साली अधिग्रहित केली. त्यानंतर करारनामा करण्यात आला. मात्र, वेकोलि प्रशासनाने तेव्हापासून आजवर आपल्याला अधिग्रहित शेतीचा मोबदला दिला नाही. मग आपण शेतीचा ताबा सोडायचा कसा, असा प्रतिप्रश्नही देवराव ढोके यांनी लोकमतशी बोलताना केला. आपल्या कुटुंबाची उपजीविका ही शेतीच्या अवलंबून आहे. उपजीविकेचे दुसरे कोणतेही साधन नाही. तेव्हा वेकोलि प्रशासनाने आपल्याला आधी मोबदला द्यावा, नंतर जमीन ताब्यात घ्यावी, अशी मागणीही देवराव ढोके यांनी केली आहे.
नुकसानभरपाई देणार कोण?
हा रस्ता तयार करण्यापूर्वी वेकोलि प्रशासनाने देवराव ढोके यांना कोणतीही लेखी अथवा तोंडी पूर्वसूचना दिली नाही. त्यातच हा रस्ता तयार करण्यासाठी जेसीबीच्या मदतीने शेतातील कपाशीची झाडे उपटून फेकण्यात आली. त्यात किमान ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. याची जबाबदारी स्वीकारणार कोण, असा प्रश्न देवराव ढोके यांनी उपस्थित केला. दुसरीकडे, या प्रकाराबाबत आपल्याला कुठलीही माहिती नाही, असे वेकोलिचे नागपूर कार्यालयातील व्यवस्थापक गेडाम यांनी सांगितले. त्यामुळे हा रस्ता कुणाच्या आदेशान्वये तयार करण्यात आला, हा प्रश्न अनुत्तरित आहे.