डब्लू.सी.एल. सोसायटी ‘सीबीआय’च्या फेऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:11 AM2021-08-14T04:11:36+5:302021-08-14T04:11:36+5:30
उमरेड : कोळसा कामगारांच्या घामाच्या बळावर चालणारी डब्लू.सी.एल. एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. उमरेड प्रोजेक्ट ही सहकारी पतपुरवठा संस्था ...
उमरेड : कोळसा कामगारांच्या घामाच्या बळावर चालणारी डब्लू.सी.एल. एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. उमरेड प्रोजेक्ट ही सहकारी पतपुरवठा संस्था केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) या तपासणी यंत्रणेच्या कचाट्यात अडकली आहे.
या पतसंस्थेने २००९ ला केलेल्या एक कोटी रुपयाच्या गुंतवणुकीबाबत विचारणा करणारे पत्र सोसायटीला सीबीआयने दिले आहे. या प्रकरणाच्या चौकशीमुळे सोसायटीचे तत्कालीन संचालक मंडळ आणि अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उमरेड वेकोलि येथे १९६४ पासून डब्लू.सी.एल. एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. उमरेड प्रोजेक्ट ही सहकारी पतपुरवठा संस्था कार्यरत आहे. कोळसा खाणीतील कामगार वर्ग या पतसंस्थेचे सदस्य असून, सध्या १,९०७ सदस्यसंख्या आहे. कामगारांच्या ठेवी, कर्ज वितरण, कापड विक्री, किराणा आणि स्वयंपाकाचा गॅस पुरवठा करणे, असा संपूर्ण कारभार या सोसायटीचा चालतो. ३० कोटी रुपयांची उलाढाल असलेली ही तालुक्यातील मोठी पतसंस्था आहे.
या सोसायटीच्या तत्कालीन संचालक मंडळाने २९ सप्टेंबर २००९ ला कोलकत्ता येथील व्हेटेल एव्हरेस्ट कॅप सोल्युशन्स लिमिटेड कंपनीत एक कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याबाबतचा ठराव पारित केला. ही गुंतवणूक बँक गॅरंटीच्या आधारावर करावी, असा ठराव तत्कालीन अध्यक्ष सी. एस. पिल्ले, उपाध्यक्ष अजय मोहोड, सचिव बबन पोटे, कोषाध्यक्ष प्रकाश नागभीडकर आणि अन्य संचालक मंडळाच्या उपस्थितीत पारित करण्यात आला.
यासाठी ३१ ऑक्टोबर २००९ ला उमरेडच्या सहायक निबंधक कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला. १६ नोव्हेंबर २००९ ला सहायक निबंधकांनी एक कोटी रुपयाच्या गुंतवणुकीसाठी काही अटींवर हिरवी झेंडी दिली. दोन वर्षापेक्षा अधिक काळ गुंतवणूक नसावी, राष्ट्रीयीकृत बँकेची गॅरंटी आवश्यक असून, रक्कम मुदतीत प्राप्त होईल सोबतच सोसायटीच्या सभासदांचे आर्थिक नुकसान होऊ नये याबाबत काळजी घ्यावी, अशा अटी निबंधक कार्यालयाने या ठरावाला संमती देताना पत्रात नमूद केल्या.
त्यानंतर हैदराबाद सुलतान बाजार शाखेच्या आंध्र बँकेने उमरेड येथील या डब्लू.सी.एल. सोसायटीची गॅरंटी घेतली. ५ फेब्रुवारी २०१० आणि ३ डिसेंबर २०१२ अशा दोन वेगवेगळ्या तारखेला प्रत्येकी ५० लाख असे एकूण एक कोटी रुपयाची गुंतवणूक कोलकाता येथील व्हिटेल एव्हरेस्ट कॅप सोल्युशन्स लिमिटेड कंपनीत करण्यात आली.
काही वर्षांतच व्हिटेल कंपनीचे दिवाळे निघाले. ठेवीधारकांना धक्का बसला. व्हिटेल कंपनीची सीबीआय चौकशी सुरू झाली. व्हिटेल कंपनीत उमरेड वेकोलि येथील ‘डब्लू.सी.एल. एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. उमरेड प्रोजेक्ट’ या संस्थेने एक कोटी रुपयाची गुंतवणूक कशी, केव्हा, कोणत्या आधारावर केली, आदी संपूर्ण दस्तऐवजांची मागणी करणारे पत्र सीबीआयने या सोयायटीला पाठविले आहे.
१३ जुलै २०२१ ला सदर पत्र सोसायटीत पोहोचल्यानंतर एक कोटी रुपयाच्या गुंतवणूक प्रकरणाबाबतच्या फाईलवरील धूळ झटकण्यास सुरुवात झाली. सध्या सोसायटीचे संचालक मंडळ तथा अधिकारी जुन्या कागदपत्रांची जुळवाजुळव करीत असून, यातूनच गुंतवणुकीचे घबाड समोर आल्यास अनेकांचे कारनामे उजेडात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सोसायटीची चमू सीबीआयसमोर
सीबीआयचे पत्र धडकताच सोसायटीने तातडीने बैठक घेत तीन जणांची समिती नेमली. ही समिती ओडिशामधील भुवनेश्वर येथील सीबीआय कार्यालयात कागदपत्रांसह गेली होती. दुपारी १२ ते सायंकाळी ७ पर्यंत सीबीआयसमोर प्रश्नोत्तरे चालली. सीबीआयचे समाधान झाले नाही, अशीही बाब बोलली जात आहे.
---
ही गुंतवणूक आमच्या कार्यकाळातील नाही. आम्ही सोसायटीचे इंटरनल ऑडिट, टॅक्स ऑडिट लवकरच करणार आहोत. सध्या याप्रकरणी सखोल अभ्यास-तपास करीत आहोत.
दिलीप पटेल, अध्यक्ष, डब्लू.सी.एल. एम्प्लॉईज
को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. उमरेड प्रोजेक्ट