आम्ही मेहनत करणारे मंत्री, विकास हेच ध्येय अन् मोदींचाही खंबीर पाठिंबा: मुख्यमंत्री शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 12:30 PM2022-12-11T12:30:58+5:302022-12-11T12:31:29+5:30
मुंबई-नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आलं.
नागपूर-
मुंबई-नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित करताना महामार्गाच्या कामाची माहिती दिली. तसंच पंतप्रधानांचे आभार व्यक्त केले. समृद्धी महामार्गाचं काम करताना अनेक अडचणी आल्या. पण आमचं ध्येय निश्चित होतं. काही करुन आम्हाला महाराष्ट्राच्या विकासाचा हा महामार्ग पूर्ण करायचा होता. आम्ही मेहनत करणारे मंत्री आहोत आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हेच आमचं ध्येय आहे. त्यात देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खंबीर पाठिंबा महाराष्ट्राला मिळाला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
मोदींमुळेच 'समृद्धी' महामार्गाचं स्वप्न पूर्ण झालं नाहीतर...; देवेंद्र फडणवीसांनी मानले आभार
"समृद्धी महामार्गाचं स्वप्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी पाहिलं. त्यांनी या प्रकल्पाची जबाबदारी माझ्याकडे देऊन माझ्यावर विश्वास दाखवला. समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासाचा मार्ग आहे आणि तो विक्रमी वेळेत पूर्ण करु शकलो याचा आम्हाला सार्थ अभिमान व आनंद आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या ध्येयामुळे महाराष्ट्रालाही त्यांनी पाठिंबा दिला आहे. हे सरकार अस्तित्वात येत असताना जनतेचा विकास आणि राज्याच्या प्रगतीसाठी काम करा असं त्यांनी मला व फडणवीसांना सांगितलं. याच मार्गानं आम्ही काम करत आहोत", असं एकनाथ शिंदे म्हणाले.
VIDEO: समृद्धी महामार्गाचं लोकार्पण अन् पंतप्रधान मोदींची CM शिंदेंच्या पाठिवर कौतुकाची थाप!
आम्ही मेहनत करणारे मंत्री
"राज्याचा सर्वांगिण विकास करणं हेच आमचं ध्येय आहे. जनतेसाठी काम करणारे आणि मेहनत करणारे आमचे मंत्री आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही महाराष्ट्राला यापुढे असाच पाठिंबा कायम राहिल असा विश्वास आम्हाला आहे. मोदींचे आशीर्वाद आमच्यावर राहावेत यापुढेही महाराष्ट्र अशीच प्रगती करत राहिल हा विश्वास आम्ही देतो", असं एकनाथ शिंदे म्हणाले.