आम्ही 'आंदाेलनजीवी' नाही; झाडांच्या प्रेमासाठी उतरलो रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 09:37 AM2021-06-07T09:37:42+5:302021-06-07T09:38:10+5:30
Nagpur news झाडे वाचतील तरच येणाऱ्या पिढीला सुखाने जगता येईल. म्हणूनच काेटीच्या काटी झाडे लावण्याचे संकल्प साेडले जातात. मग अस्तित्वात असलेल्या झाडांवर का कुऱ्हाड चालविली जात आहे, असा त्यांचा सवाल आहे आणि रस्त्यावर येऊन याच प्रश्नाची उत्तरे ते धाेरणकर्त्यांना मागत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनी वनामधील हजाराे झाडे ताेडण्याच्या विराेधात सुरू असलेल्या आंदाेलनाने नागपूरकरांमध्ये निसर्गाप्रती जागृती निर्माण केली आहे. याचे श्रेय जाते ते गेल्या आठ महिन्यांपासून सतत आंदाेलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना. राजकीय पक्षाचे असाे किंवा एखाद्या संघटनांचे आंदाेलन, त्यात काहीतरी स्वार्थ दडलेला असताे. मात्र या कार्यकर्त्यांनी काेणताही स्वार्थ मनात न ठेवता केवळ झाडांच्या प्रेमापाेटी हे आंदाेलन चालविले आहे.
यात विद्यार्थी आहेत, खासगी, शासकीय नाेकरदार आहेत, व्यवसायी, डाॅक्टर अन इंजिनिअरही रस्त्यावर उतरले. ते कधी कुठल्याही आंदाेलनात गेले नाहीत पण यावेळी ते रस्त्यावर उतरले. कारण एक-दाेन नाही तर ४० हजारावर झाडे ताेडली जाणार आहेत. सकाळी उठून हातात बॅनर, पाेस्टर धरून ते उभे राहतात आणि नाेकरीची वेळ झाली की कामावर निघून जातात. त्यांचे आंदाेलन त्यांच्यासाठी नाही तर नागपुरात राहणाऱ्या प्रत्येकाच्या चांगल्या आराेग्यासाठी आहे. पर्यावरणाचे महत्त्व नव्याने सांगण्याची गरज नाही. झाडे वाचतील तरच येणाऱ्या पिढीला सुखाने जगता येईल. म्हणूनच काेटीच्या काटी झाडे लावण्याचे संकल्प साेडले जातात. मग अस्तित्वात असलेल्या झाडांवर का कुऱ्हाड चालविली जात आहे, असा त्यांचा सवाल आहे आणि रस्त्यावर येऊन याच प्रश्नाची उत्तरे ते धाेरणकर्त्यांना मागत आहेत.
- बुटीबाेरी येथील एका ऑटाेमाेबाईल कंपनीत ऑटाेमाेबाईल इंजिनिअर असलेला कुणाल माैर्य सातत्याने अजनीच्या झाडांसाठी लढताे आहे. आपल्या तरुण सहकाऱ्यांना घेऊन सकाळी ताे अजनी परिसरात बॅनर धरून लाेकांना जागे करीत असताे. १० वाजले की पुन्हा घराकडे निघून कामावर जाण्यास सज्ज हाेताे. सुटी असली की सायंकाळीही १०-१२ सहकाऱ्यांना घेऊन रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांना झाडे वाचविण्याचे आवाहन करीत असताे.
- राेहन अरसपुरे व पंकज जुनघरे यांच्यासारखे विद्यार्थीही सातत्याने अजनी वनाच्या आंदाेलनाशी जुळलेले आहेत. झाडांप्रति असलेल्या आपुलकीमुळे. ‘ड्रीम फाॅर लाईफ फाऊंडेशन’च्या अनेक तरुणांना घेऊन ते आंदाेलनात सहभागी हाेतात. ग्रुपचे सारे विद्यार्थी झाडांसाठी, येणाऱ्या भविष्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
- श्रीकांत देशपांडे हे इंटेरियर डिझायनर आणि शेतकरी आहेत. मात्र पर्यावरण कार्यकर्ता म्हणून गेल्या २०-२५ वर्षांपासून कार्य करीत आहेत. रस्त्यावरचे एकही झाड ताेडले गेले तरी निराश हाेणारे देशपांडे यांनी अजनी वन बचावासाठी सततचा प्रयत्न चालविला आहे. स्वत: आंदाेलनात उभे राहून तरुणांना बळ देत आहेत.