आम्ही राजकारणी कलावंतच! ‘सुरत ते गुवाहाटी’ पुस्तक लिहायला हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2023 09:25 PM2023-07-12T21:25:24+5:302023-07-12T21:25:53+5:30
Nagpur News राजकारणात काम करणारे देखील उत्तम कलाकार आहेत आणि तुम्ही हे पाहतच आहात. यावर तुम्ही ‘सुरत ते गुवाहाटी’ हे पुस्तकही लिहू शकता, अशी फटकेबाजी राज्याचे उद्याेग मंत्री व अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी नाट्य परिषदेच्या मंचावरून केली.
नागपूर : नाटकात काम करता म्हणून तुम्हीच कलावंत आहात असे नाही, राजकारणात काम करणारे देखील उत्तम कलाकार आहेत आणि तुम्ही हे पाहतच आहात. यावर तुम्ही ‘सुरत ते गुवाहाटी’ हे पुस्तकही लिहू शकता, अशी फटकेबाजी राज्याचे उद्याेग मंत्री व अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी नाट्य परिषदेच्या मंचावरून केली.
अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभात ते बाेलत हाेते. याप्रसंगी ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक डाॅ. सतीश पावडे, अ. भा. हिंदी संस्था संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय पाटील, अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, नाट्य परिषद नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकासे, उपाध्यक्ष शेखर सावरबांधे, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष दीपक माने प्रामुख्याने उपस्थित हाेते.
उदय सामंत यांनी नाट्य परिषदेत राजकारण शिरल्याचे सांगत नाट्य परिषदेची निवडणूक विधानसभेपेक्षा भारी हाेत असल्याचे ते म्हणाले. नाट्य परिषद ही क्रिकेट बाेर्डाप्रमाणे आहे. त्यामुळे क्रिकेट बाेर्डाचे नियम नाट्य परिषदेलाही लागू व्हायला हवे. नाट्य संमेलनाच्या वेळी काही निर्माते आपली नाटके सादर करतात. अशा निर्मात्यांवर बंधने लावायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले. नाट्य परिषदेच्या ६० शाखा आहेत. त्यापैकी माेजक्याच चांगले काम करीत असून नागपूर त्यातील एक आहे. शंभरावे नाट्य संमेलन थाटात हाेणार असून नागपूरही त्याचा एक भाग असेल. नागपूर शाखेचा आदर्श कमजाेर असलेल्या सिंधूदुर्ग, रत्नागिरीसारख्या शाखांपर्यंत पाेहचायला हवा, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक नरेश गडेकर यांनी तर संचालन वैदेही चवरे-सोईतकर यांनी केले.
शरद पवारांशी चांगला समन्वय
नाट्य परिषदेवर शरद पवार हे तहहयात विश्वस्त आहेत. परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी पवार विरुद्ध सामंत असे चित्र रंगविण्यात आले. यात आमच्या पॅनलचा विजय झाला. मात्र आमच्यात असा कुठलाही सामना नव्हता. उलट शरद पवारांशी चांगले समन्वय आहे. मी काेणत्याही सदस्याला त्याचा पक्ष विचारत नाही. नाट्य परिषदेची सेवा हाच आमचा पक्षा आहे, असे वक्तव्य सामंत यांनी केले.
अरविंद पाठक यांना जीवनगाैरव
आपली हयात रंगमंचावर घालविणारे ज्येष्ठ रंगकर्मी अरविंद पाठक यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. यासह ज्येष्ठ रंगकर्मी संजय वलिवकर यांना श्रेष्ठ रंगकर्मी पुरस्कार, ज्येष्ठ रंगकर्मी बापू चनाखेकर यांना कुसुमताई भुसारी स्मृती रंगसेवा पुरस्कार, अभिनेत्री रूपाली माेरे यांना श्रेष्ठ रंगकर्मी पुरस्कार, नाट्य लेखनाचा राम गणेश गडकरी सर्वाेत्कृष्ठ लेखक पुरस्कार आनंद भिमटे यांना देण्यात आला. याशिवाय मंदार माेराेणे यांना नाट्य समीक्षा पुरस्कार, गणेशकुमार वडाेदकर यांना सर्वाेत्कृष्ठ बालनाट्य लेखक पुरस्कार, झाडीपट्टी रंगभूमीचे ज्येष्ठ नाट्यलेखक अमरकुमार मसराम यांना झाडीपट्टी ज्येष्ठ रंगकर्मी तर अभिनेत्री वर्षा शुक्ला-गुप्ते यांना झाडीपट्टी श्रेष्ठ रंगकर्मी पुरस्कार प्रदान करण्यात आला.