आमचा श्वास कोंडतो आहे; भांडेवाडी परिसरातील नागरिक दहशतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 07:30 AM2021-04-23T07:30:00+5:302021-04-23T07:30:02+5:30
Nagpur news नागपूर जिल्ह्यातून निघणाऱ्या मेडिकल वेस्टची विल्हेवाट भांडेवाडी डंम्पिंग यार्डमध्ये लावली जाते. मेडिकल वेस्ट नष्ट करीत असताना सातत्याने निघत असलेल्या धुरामुळे भांडेवाडी परिसरातील वस्त्यांमधील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर आणि नागपूर जिल्ह्यातून निघणाऱ्या मेडिकल वेस्टची विल्हेवाट भांडेवाडी डंम्पिंग यार्डमध्ये लावली जाते. मेडिकल वेस्ट नष्ट करीत असताना सातत्याने निघत असलेल्या धुरामुळे भांडेवाडी परिसरातील वस्त्यांमधील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. तसाही हा परिसर आजाराच्या विळख्यातच आहे. अशातच आता कोरोनामुळे आणखी भीती नागरिकांमध्ये पसरली आहे.
सध्या कोरोनामुळे मेडिकल वेस्टमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. ट्रक भरून मेडिकल वेस्ट भांडेवाडी परिसरात आणले जात आहे. सुपबर हायजेनिक डिस्पोजल या कंपनीच्या माध्यमातून मेडिकल वेस्टची विल्हेवाट लावली जाते. मेडिकल वेस्ट नष्ट करीत असताना निघणाऱ्या धुरामुळे वायुप्रदूषण होत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. डम्पिंगमुळे पूर्वी त्रस्त असलेले नागरिक मेडिकल वेस्टमुळे आणखी दहशतीत आहेत. डम्पिंग यार्ड परिसरात भांडेवाडी, पारडी, गिरजानगर, वाठोडा, बीडगाव, तरोडी, खेडी, नागेश्वर नगर, अंतुजीनगर, भोलेनगर , दुर्गानगर, संघर्षनगर अशा अनेक वस्त्या आहेत. या वस्त्यांमध्ये दमा, खोकला, ताप, कावीळ, मलेरिया, टायफाईड, किडनी व हृदयरोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहे.
सध्या कोरोनाची दहशत आहे. कोरोना हवेतूनही पसरत असल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. परिसरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. अनेकांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. मेडिकल वेस्ट नष्ट करताना रात्रभर धूर निघत असतो, असे परिसरातील लोकांचे म्हणणे आहे.
- भांडेवाडी आणि आसपासचा परिसर नागपूर शहरातील सर्वात प्रदूषित परिसर आहे. रात्रीला बाहेर फिरताना जीव गुदमरल्याचा अनुभव येतो. कुठल्याही आजाराचा पहिला रुग्ण आमच्याच परिसरात निघतो. अशा दूषित वातावरणात आम्ही कोरोनाचा सामना करीत आहोत. आता मेडिकल वेस्टमुळे होत असलेल्या प्रदूषणामुळे भीती वाटायला लागली आहे.
- सुरेश सनोडिया, रहिवासी, बीडगाव
- कार्बनडाय ऑक्साईडच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. आम्ही या प्रदूषणाच्या विळख्यात कोरोनाचा सामना करीत आहोत. परिसरात असंतोषाचे वातावरण आहे. यावर नियंत्रण न मिळविल्यास आंदोलनाची ठिणगी पेटणार आहे.
प्रकाश सोनटक्के, पूर्व विभाग अध्यक्ष, मनसे