तुमचे कार्य समाजापर्यंत पोहचविण्याचाप्रयत्न करतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:57 AM2018-12-11T00:57:09+5:302018-12-11T01:01:56+5:30
गेल्या काही दिवसांपासून नागपूरकरांना नागराज मंजुळे दिग्दर्शित व महानायक अमिताभ बच्चन अभिनय करीत असलेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाने भारावून सोडले आहे. संत्रानगरीच्या ज्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे त्या विजय बारसे यांच्याशी चित्रीकरणात घाम गाळणाऱ्या अमिताभ यांनी रविवारी भेट घेतली. रियल लाईफचे बारसे यांनी रिल लाईफमधल्या विजयशी झालेली भेट भारावणारी असल्याचे मनोगत व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून नागपूरकरांना नागराज मंजुळे दिग्दर्शित व महानायक अमिताभ बच्चन अभिनय करीत असलेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाने भारावून सोडले आहे. संत्रानगरीच्या ज्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे त्या विजय बारसे यांच्याशी चित्रीकरणात घाम गाळणाऱ्या अमिताभ यांनी रविवारी भेट घेतली. रियल लाईफचे बारसे यांनी रिल लाईफमधल्या विजयशी झालेली भेट भारावणारी असल्याचे मनोगत व्यक्त केले.
गेल्या आठ-दहा दिवसांपासून नागपुरात या चित्रपटाचे चित्रीकरण होत आहे. मात्र या काळात विजय बारसे शहरात नव्हते. शनिवारी ते शहरात परतले तेव्हा नागराज यांनी अमिताभ यांच्याशी भेटण्याचे आमंत्रण बारसे यांना दिले. त्यानुसार रविवारी सेंट जॉन शाळेत असलेल्या चित्रीकरण स्थळीच बारसे यांनी कुटुंबासह जाऊन बच्चन यांची भेट घेतली. यावेळी पत्नी प्रा. रंजना, मुलगा डॉ. अभिजित व प्रियेश सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. तब्बल १० मिनिटे आमच्यामध्ये धावती चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘तुम्ही अनेक चित्रपटात विजय या नावाने काम केले. माझेही नाव विजय आहे’ असे सांगताच त्यांच्या चेहºयावर हास्य फुलले. यावेळी अमिताभ यांनी, ‘तुमच्या जीवनावर, केलेल्या कार्यावर होत असलेल्या चित्रपटात काम करायला मिळत असून याचा फार आनंद होत आहे’ असे सांगितले. ‘चित्रपटातून तुमचे कार्य व तुमचा संदेश समाजापर्यंत पोहचविण्याचा पूर्ण प्रयत्न करेन’ असा विश्वास त्यांनी दिल्याचे बारसे यांनी सांगितले.
अमिताभ यांना भेटण्यासाठी यापूर्वी त्यांच्या घरी व कार्यालयात गेलो होतो. मात्र त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट होऊ शकली नव्हती. यावेळी मात्र तो क्षण आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. ज्यांना भेटण्यासाठी लोक नेहमी उत्सुक असतात त्या महानायकाशी कुटुंबासह प्रत्यक्ष भेट होणे, हे नशीबच होय, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र गेली ४०-५० वर्षे केलेल्या कार्यामुळे हे शक्य झाले याचे समाधान वाटते. आपण अभावग्रस्तांसाठी, वंचितांसाठी हवे ते कार्य करू शकतो, हा संदेश समाजापर्यंत पोहचणे महत्त्वाचे आहे. महानायकाच्या माध्यमातून हा संदेश प्रभावीपणे पोहचतो आहे, याचे खरोखरच समाधान वाटत असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. या कार्यामुळेच महानायकाची शुटींग नागपुरात होत आहे, ही नागपूरकर म्हणून गौरवास्पद असल्याची भावनाही त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.