आम्ही कर्तव्य पार पाडतोच
By admin | Published: February 21, 2017 02:25 AM2017-02-21T02:25:14+5:302017-02-21T02:25:14+5:30
आयुष्याची सत्तरी ओलांडणाऱ्या नागरिकांसाठी निवडणुकीचा अनुभव काही नवा नाही.
मतदान न करणाऱ्यांनी जाब विचारू नये : ज्येष्ठांनी दिला विचार
नागपूर : आयुष्याची सत्तरी ओलांडणाऱ्या नागरिकांसाठी निवडणुकीचा अनुभव काही नवा नाही. अनेक उन्हाळे-पावसाळे पाहण्यासारखाच अनुभव या ज्येष्ठांना निवडणुकांचा आहे. देशात बदलणारी परिस्थिती त्यांनी पाहिली आहे. त्या बदलाचे स्मरण आणि जाणीवही त्यांना आहे. त्यामुळे निवडणुकीचा तसा उत्साह नसला तरी मतदान करण्याची आवश्यकता त्यांना माहिती आहे. त्यामुळे होऊ घातलेली महानगरपालिकेची निवडणूक त्यांना महत्त्वाची वाटते. आयुष्याची सायंकाळ चांगली जावी ही माफक अपेक्षा ज्येष्ठ नागरिकांची असते. वार्धक्याच्या काळात शहरातील वातावरण आरोग्यदायी राहावे, महानगरपालिकेशी जुळलेली लहान-मोठी कामे करता यावी एवढीच त्यांची इच्छा. हे करण्यासाठी आपला प्रतिनिधी चांगला असावा व प्रश्न सोडविण्यासाठी तो सक्षम असावा याची जाणीव त्यांना अनुभवातून मिळाली आहे. त्यामुळेच की काय संवैधानिक अधिकाराप्रति आणि सोबत आलेल्या कर्तव्याची त्यांना जाणीव आहे. लोकमतने या ज्येष्ठांशी साधलेला हा संवाद. (प्रतिनिधी)
मतदान आमचा अधिकार आहे
वयाची सत्तरी पार केली असल्याने अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिल्यासारखा अनेक निवडणुकांचाही अनुभव आहे. कधी चांगला तर कधी वाईट. मनासारखे चित्र दिसत नसल्याने अनेक वेळा निराशाही होते. मात्र मतदान आमचा अधिकार आहे आणि तो निभावणे आमचे कर्तव्यही आहे. वारंवार मिळणारी ही संधी शेवटच्या क्षणापर्यंत निभावण्याची इच्छा आहे.
- सुदर्शन सुभेदार
प्रत्येकाने कर्तव्य बजावले पाहिजे
मतदान न करता व्यवस्था वाईट आहे, असे बोलणे योग्य नाही. कधी आपल्या मनासारखे होतेच, असे नाही. मात्र प्रत्येकाने आपले कर्तव्य बजावण्याची गरज आहे. काही सकारात्मक बदल घडविण्याची इच्छा असेल तर मतदान हे केलेच पाहिजे. स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून अनेक निवडणुका अनुभवल्या आहेत. लोकसभा, विधानसभा असो की महापालिका, प्रत्येक निवडणूक महत्त्वाची असते. - द.शा. पंडे
आपण चुकायचे नाही
आपण मतदान करतो व अनेक वेळा आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही. निवडून गेलेला उमेदवार आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, याची जाणीव होते आणि एवढ्या वर्षांच्या अनुभवात ती अनेक वेळा झालीही आहे. निवडणूक कोणतीही असो, न चुकता मतदान करायचे ठरविले आहे.
- माधुरी ठोसर
चांगले घडेल,
या अपेक्षेतून मतदान
अनेक वर्षांचे अनुभव सारखेच आहेत, मात्र उत्साह आजही वाटते. परिस्थिती मात्र बदलली आहे. आपल्या मनासारखे होईलच असे नाही. मात्र निवडूना येणारा उमेदवार आपल्या समस्या सोडवेल, ही अपेक्षा कायम असते. त्यामुळेच आवर्जून मतदान करावे, असे वाटते. हे आमचे शहर आहे. त्यामुळे आमच्या एका मताने चांगले होत असेल तर ही संधी आम्ही का सोडावी. - संध्या ठोसर
मतदान न करणाऱ्यांनी
जाब विचारू नये
जे लोक मतदान करणार नाही त्यांना अमूक काम झाले नाही, असा जाब विचारण्याचाही अधिकार नाही. मतदान हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे आणि लोकशाही जिवंत असण्याचे प्रतीक आहे. यातूनच आम्हाला आमचा प्रतिनिधी निवडायचा आहे. बदल हा घडणारच. मात्र तो घडविण्याची जबाबदारी आमची आहे.
- शरद देवपुजारी
उत्साहापेक्षा कर्तव्याची जाणीव
माझे वय ८० वर्षांच्यावर आहे. पक्षाची कामेही केली आहेत. त्यामुळे तरुणांसारखा उत्साह नसला तरी कर्तव्याची जाणीव मात्र आहे. आज परिस्थिती बदलली आहे. वार्धक्याच्या काळात शहरातील वातावरण आरोग्यदायी राहावे यासाठी योग्य माणसे सभागृहात पोहोचावी, ही अपेक्षा नेहमीच असते. या अपेक्षेतूनच न चुकता मतदान करण्याची इच्छा असते.
- मधुकर रोटकर