‘आम्ही संघ भूमीत भाजप साफ केली, तुम्ही कर्नाटकात करा’; विदर्भातील काँग्रेस नेत्यांची तोफ कर्नाटक प्रचारात धडाडतेय
By कमलेश वानखेडे | Published: May 6, 2023 05:31 PM2023-05-06T17:31:36+5:302023-05-06T17:32:53+5:30
Nagpur News विदर्भात भाजपला जनाधार उरलेला नाही. त्यामुळे आता कर्नाटकात तुम्हीही धाडस करा. ताकदीने मतदान करा व भाजपला हद्दपार करा, अशी विदर्भातील काँग्रेस नेत्यांची तोफ कर्नाटक निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात धडाडत आहे.
कमलेश वानखेडे
नागपूर : संघ भूमी असलेल्या नागपुरातच भाजपचा सुपडा साफ झाला आहे. देशभरात नागपूरला भाजपचा गड सागणाऱ्यांचा गड काँग्रेसने नागपूर पदवीधर, नागपूर शिक्षक व अमरावती पदवीधर अशा विधान परिषदेच्या तीन जागा जिंकून उद्ध्वस्त केला आहे. विदर्भात भाजपला जनाधार उरलेला नाही. त्यामुळे आता कर्नाटकात तुम्हीही धाडस करा. ताकदीने मतदान करा व भाजपला हद्दपार करा, अशी विदर्भातील काँग्रेस नेत्यांची तोफ कर्नाटक निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात धडाडत आहे.
कर्नाटकमध्ये १० मे रोजी मतदान होत असून, १३ मे रोजी निकाल आहे. या निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसने विदर्भातील ज्येष्ठ नेत्यांवर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविली आहे. माजी मंत्री
नितीन राऊत, सुनील केदार, विजय वडेट्टीवार, वसंत पुरके, आ. विकास ठाकरे, प्रवक्ते अतुल लोंढे हे प्रचारासाठी कर्नाटकात तळ ठोकून आहेत. गावोगावी फिरून प्रचार सभा घेत असून, तेथे नागपूरसह विदर्भात भाजपचे कसे पानिपत झाले आहे, हे कर्नाटकातील जनतेसमोर मांडत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेसप्रणीत आघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा करीत तुम्ही कर्नाटकात सरकार आणा, असे आवाहनही हे नेते मतदारांना करीत आहेत.
एवढेच नव्हे तर कोरोना काळातही महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आले तर येथेही शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास तेथील शेतकऱ्यांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
प्रचारात ‘खोके अन् बोके’
- महाराष्ट्रातील सत्तांतर कर्नाटकच्या निवडणुकीत चांगलेच चर्चेत आहे. विदर्भातील काँग्रेस नेते खोके देऊन महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले व बोके सत्तेवर बसले, असा मुद्दा ठासून मांडत आहे. कर्नाटकात अशी खोके देऊन सरकार बनविण्याचा दूषित हेतू साध्य होऊ नये म्हणून एकतर्फी बहुमत द्या, असे भावनिक साकडे विदर्भातील काँग्रेस नेते कर्नाटकातील जनतेला घालत आहेत.
अशी आहे नेत्यांची जबाबदारी - उमेदवारांची यंत्रणा योग्यरित्या काम करीत आहे का, ते तपासणे, त्याला कुठे त्रास होत आहे याची माहिती घेणे.
- तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेले नेते काम करीत आहेत का ते पाहणे व दिल्लीतील नेत्यांशी त्यांची भेट घालून देत त्यांना पक्षाच्या कामी लावणे.
- समज दिल्यानंतरही स्थानिक नेते विरोधात काम करीत असतील तर त्यांचा अहवाल हायकमांडला सादर करणे.
- बूथ स्तरावरील पक्षाची यंत्रणा कशी कार्यरत आहे याची पडताळणी करणे.
- मतदारसंघातील प्रमुख नेत्यांच्या व विविध समाजातील प्रमुख लोकांच्या भेटी घेणे.