सेना-भाजप युती तुटावी अशी आमची इच्छाच नव्हती: बावनकुळे; बेईमानी केल्याने घेतला बदला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 08:00 AM2022-12-31T08:00:26+5:302022-12-31T08:01:09+5:30
मी एकदाच बारामतीत गेलो आणि पवारांना त्याचे नेमके इतके काय लागले, असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :सेना-भाजप युती तुटावी अशी आमची इच्छाच नव्हती. जर दोन्ही पक्ष सोबत असते तर अनेक वर्षे सत्तेत राहिलो असतो, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत केले. देवेंद्र फडणवीसांचा चेहरा वापरून त्यांनी निवडणुका लढविल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. जेव्हा जेव्हा समाजात बेईमानी होते तेव्हा निसर्गच बदला घेत असतो. शिंदे-फडणवीसांचे सरकार हे नैसर्गिक सरकार आहे, असा दावा बावनकुळे यांनी केला.
महाविकास आघाडीच्या काळात पालकमंत्री आणि मुख्यमंत्री आढावा बैठकाच घेत नव्हते. शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून मिळत असलेली तोकडी मदत हे महाविकास आघाडी सरकारचेच पाप आहे, असा आरोपही त्यांनी केला.
पवारांना इतके काय लागले?
अजितदादांनी तुमचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिलाय, असा उल्लेख राष्ट्रवादीचे सदस्य शशिकांत शिंदे यांनी त्यांच्या भाषणात केला. यावर मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे तर बारामतीच्या दौऱ्यात मी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येणार असे बोलू का? माझी भूमिका आमच्या पक्षाच्या उमेदवारासाठीच असेल हे स्पष्ट आहे. मी एकदाच बारामतीत गेलो आणि पवारांना त्याचे नेमके इतके काय लागले, असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"