आम्ही ओन्यो कोठाओ जाबोना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:07 AM2021-03-27T04:07:49+5:302021-03-27T04:07:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोलकाता : एकीकडे पश्चिम बंगालमध्ये भाजपने काही अभिनेत्यांना रिंगणात उतरवले असताना दुसरीकडे भाजपच्या अजेंड्याविरोधात एका गाण्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता : एकीकडे पश्चिम बंगालमध्ये भाजपने काही अभिनेत्यांना रिंगणात उतरवले असताना दुसरीकडे भाजपच्या अजेंड्याविरोधात एका गाण्याने धूम केली आहे. बंगालमधील विविध कलाकार या गाण्याच्या माध्यमातून भाजपविरोधात एकत्र आले आहे. ‘आम्ही ओन्यो कोठाओ जाबोना...’ म्हणजेच आम्ही कुठेही जाणार नाही, आम्ही याच देशाचे आहोत, असा संदेश या माध्यमातून देण्यात येत आहे. भाजपच्या ‘सीएए’च्या भूमिकेला खुलेआमपणे आव्हान देण्यात आले आहे.
बंगालमधील अभिनेते अनिर्बान भट्टाचार्य यांनी लिहिलेल्या गाण्यावर हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला असून ‘सोशल मीडिया’वर तो खूप ‘व्हायरल’ झाला आहे. बुधवारी एका ‘फेसबुक पेज’वर हा ‘व्हिडिओ’ पोस्ट करण्यात आला. यात रुद्रप्रसाद चक्रवर्ती, अनिन्द्य मुखोपाध्याय, सुमन मुखोपाध्याय, कौशिक सेन, अनुपम रॉय, रुपंकर बागची यांच्यासह २० हून अधिक अभिनेते, अभिनेत्री, नाट्य व चित्रपट दिग्दर्शक, संगीतकार, गायक यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारचे ‘रिपोर्टकार्ड’
या व्हिडिओच्या माध्यमातून केंद्र सरकारचे मागील सहा वर्षातील रिपोर्टकार्ड मांडण्यात आल्याचे दिग्दर्शिका व अभिनेत्री रिद्धी सेन यांनी सांगितले. यात सहा वर्षातील वादग्रस्त मुद्द्यांना स्पर्श करण्यात आला आहे. तुकडे तुकडे गँग, अँटी नॅशनल्स, गो टू पाकिस्तान, महिला सुरक्षा यासारख्या मुद्द्यांनादेखील यातून स्पर्श करण्यात आला आहे. सोबत ‘सीएए’विरोधातदेखील अप्रत्यक्षपणे भूमिका मांडण्यात आली आहे.