विकास मंडळ नको, स्वतंत्र विदर्भ राज्य हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 12:27 AM2020-05-26T00:27:55+5:302020-05-26T00:29:29+5:30
विदर्भ विकास मंडळाची मुदत संपल्याने आता पुन्हा या मंडळाला मुदतवाढ मागणे सुरू झाले आहे. मात्र विदर्भ विकास मंडळ नको तर स्वतंत्र विदर्भ राज्य हवे, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे. या मागणीसाठी २६ मे रोजी संपूर्ण विदर्भातील विदर्भवादी कार्यकर्ते लॉकडाऊनमध्ये आपल्याच घरी राहून आंदोलन करणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भ विकास मंडळाची मुदत संपल्याने आता पुन्हा या मंडळाला मुदतवाढ मागणे सुरू झाले आहे. मात्र विदर्भ विकास मंडळ नको तर स्वतंत्र विदर्भ राज्य हवे, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे. या मागणीसाठी २६ मे रोजी संपूर्ण विदर्भातील विदर्भवादी कार्यकर्ते लॉकडाऊनमध्ये आपल्याच घरी राहून आंदोलन करणार आहेत.
'विदर्भ विकास मंडळ नको, आम्हाला हवे स्वतंत्र विदर्भ राज्य’ असे फलक तयार करून तशा घोषणा देऊन याचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकावे, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे. विदर्भ विकास मंडळाची मुदत ३० एप्रिलला संपली. ती वाढवून देण्याची मागणी सध्या विदर्भातील काही नेत्यांकडून तसेच आजी-माजी मंत्र्यांकडून होत आहे. मात्र या मागणीचा विदर्भवाद्यांनी विरोध दर्शविला आहे. अकोला व नागपूर करार सरकारने पाळला नाही. विदर्भ विकास मंडळ गठित करून केवळ भ्रमनिरास केला. त्यामुळे आता पुन्हा ती वेळ यायला नको. यासाठी वेगळा विदर्भ हाच पर्याय, असे विदर्भवाद्यांनी म्हटले आहे. तत्कालीन संविधानात तरतूद करून विदर्भ विकास मंडळाची घोषणा करून विदर्भातील जनतेला आकर्षित केले. परंतु ३८ वर्ष मंडळ तयारच केले नाही. शेवटी १९९४ साली विदर्भ विकास मंडळाची स्थापना केली. या मंडळाला केव्हाच पूर्ण निधी दिलाच नाही. परिणामी हे विदर्भ विकास मंडळ कुचकामी ठरले. हा शोभेचा पांढरा हत्ती आम्हाला नको, स्वतंत्र विदर्भ राज्य, ही मागणी सरकारने मान्य करावी यासाठी हे आंदोलन असणार आहे. विदर्भातील ११ ही जिल्ह्यांचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा अध्यक्षांच्या सहीची ११ पत्रे राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पाठविले जाणार असल्याची माहिती मुख्य संयोजक राम येवले यांनी दिली आहे.