आम्हाला अंतराळाची सफर केल्याचा भास झाला !
By गणेश हुड | Published: April 25, 2024 03:11 PM2024-04-25T15:11:49+5:302024-04-25T15:13:10+5:30
Nagpur : विद्यार्थ्यांनी इस्त्रो भेटीच्या सीईओ पुढे उलगडल्या आठवणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इस्रोची दुनियाच वेगळी आहे. आम्ही वेगळ्याच ठिकाणी आल्याचे वाटत होते. येथे वेगवेगळ्या प्रतिकृती, मिसाइल बघितले. अवकाशगंगेतील रहस्य जाणून घेता आले. आम्हाला खूप काही शिकता आले. आम्हाला जणू अंतराळाची सफर केल्याचा भास झाला असे अनुभव जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी इस्रोभेटीवरून परतल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्याशी शेअर केले.
कॉफी वुईथ सीईओ या उपक्रमांतर्गत सौम्या शर्मा यांनी अभ्यास दौऱ्यावरून परतणाऱ्या विद्यार्थ्यांना मंगळवारी आपल्या केबिनमध्ये बोलावून त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना आलेले अनुभव ऐकले. विद्यार्थ्यांचे कौतुक केले. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या माध्यमिक शाळांमधील दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या २५ मुलामुलींचा ग्रुप कर्नाटकातील म्हैसूर येथील अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोभेटीला गेला होता. यामध्ये पाचगाव, बोथिया पलोरा, कोदामेंढी व नांद हायस्कूलमधील विद्यार्थी, तर पीएमश्री शाळा तारणा तसेच मुख्यमंत्री माझी सुंदर जिल्ह्यातील प्रथम शाळा भारकस व आदिवासी भागातील सावरा शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांची ही भेट त्यांना पुढील शैक्षणिक जीवनात उपयोगी ठरावी. त्यांच्या ज्ञानात भर पडावी या हेतुनें प्राथमिक शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत आयोजित होती. या विद्याथ्यांनी इस्रोला भेट दिल्यानंतर तेथील अनुभव पाठीशी घेऊन आले. ते अनुभव नक्कीच प्रेरणादायी होते. ही बाब ओळखून सीईओंनी त्यांना जिल्हा परिषद मुख्यालयात आपल्या केबिनमध्ये बोलाविले. सर्व विद्यार्थ्यांशी हितगुज करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. राज्याबाहेर जाण्याची संधी समग्र शिक्षामधून पहिल्यांदाच मिळाल्याने विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे, समग्रचे कार्यक्रमप्रमुख वानखेडे व या उपक्रमात सहभागी शिक्षक उपस्थित होते.