लसीकरण झाले होते म्हणूनच हिमतीने लढलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:09 AM2021-05-09T04:09:34+5:302021-05-09T04:09:34+5:30
उमरेड : कोविड प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले. लसीकरणानंतर नियमाकडे थोडेसे दुर्लक्ष झाले आणि मला कोरोनाने वेढले. अशातही घाबरलो ...
उमरेड : कोविड प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले. लसीकरणानंतर नियमाकडे थोडेसे दुर्लक्ष झाले आणि मला कोरोनाने वेढले. अशातही घाबरलो नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेतला. कोणत्याही प्रकारची भीती बाळगली नाही. लसीकरणाचे दोन डोस घेतल्यामुळेच सौम्य स्वरूपात कोरोना झाला आणि म्हणूनच मी कोरोनाशी हिमतीने लढू शकलो. कोरोनामुक्तसुद्धा झालो, अशा आत्मविश्वासपूर्वक प्रतिक्रिया उमरेड येथील निवासी भिवापूर बाजार समितीचे माजी सभापती पंजाबराव लहानू आंभोरे (७३) यांनी दिली.
पंजाबराव आंभोरे यांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस ४ मार्च आणि दुसरा डोस ८ एप्रिलला घेतला होता. त्यानंतर आठवड्यातच १५ एप्रिल रोजी त्यांना ताप आला. श्वसनाचा त्रास सुरू झाला. खोकल्यामुळेही ते थोडे अस्वस्थ झाले. लागलीच कोरोना चाचणी केली. अहवाल पॉझिटिव्ह आला. थोडेफार निगेटिव्ह विचारांचे चक्र सुरू झाले असले तरी त्यापेक्षाही आपण दोनदा लसीकरण केल्यानेच लक्षणे सौम्य स्वरूपात असल्याचे सकारात्मक विचार त्यांच्या मनात डोकावले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच औषधोपचार सुरू केला आणि ते कोरोनामुक्त झाले.
लसीकरणाबाबत असंख्य अफवा आणि चर्चेला सोशल मीडियावर पेव फुटले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होत असते. शिवाय शहरापेक्षा ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणासाठी फारसे पुढे येताना दिसत नाही. लसीकरणाच्या अपप्रचारामुळे हे झाले आहे. मी कोरोनाच्या संकटातून केवळ लसीकरणामुळेच बचावलो. तेव्हा लसीकरण अवश्य करा. घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही, असे आवाहन आंभोरे यांनी केले आहे.
--
कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. ४५ ते ६० दिवसाच्या अंतराने लसीकरण करावे. लसीकरणानंतर फुफ्फुसाचा आजार होण्याची शक्यता कमी असते. आंभोरे यांनी दोनदा लसीकरण केल्यामुळेच त्यांना कोरोना झाल्यानंतरही ते सुखरूप बाहेर पडले. खोट्या व बिनबुडाच्या संदेशाकडे दुर्लक्ष करावे.
डॉ. शिरीष मेश्राम, बालरोग तज्ज्ञ, उमरेड