बहिष्कृतांची वर्गीय बांधणी करावी लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:04 AM2018-07-11T00:04:41+5:302018-07-11T00:06:51+5:30
हेवेदावे, अहंकार, अविश्वास अशा अनेक गोष्टी दलित पँथरच्या फुटीसाठी कारणीभूत आहेत. यातून धडा घ्यावा लागेल, कारण परिस्थिती वाईट आली आहे. धार्मिक सरंजामशाहीतून सामान्य माणसाची, संविधानाची व लोकशाहीची कबर खोदली जात आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांच्या राजकारणाची मर्मदृष्टी स्वीकारावी लागेल. चळवळ जातीय चौकटीत खिळून ठेवण्यापेक्षा वेगळे पाडण्यात आलेल्या सर्वहारा, शोषित आणि बहिष्कृतांना एकत्रित करून वर्गीय बांधणी करावी लागेल, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक, कवी आणि विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हेवेदावे, अहंकार, अविश्वास अशा अनेक गोष्टी दलित पँथरच्या फुटीसाठी कारणीभूत आहेत. यातून धडा घ्यावा लागेल, कारण परिस्थिती वाईट आली आहे. धार्मिक सरंजामशाहीतून सामान्य माणसाची, संविधानाची व लोकशाहीची कबर खोदली जात आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांच्या राजकारणाची मर्मदृष्टी स्वीकारावी लागेल. चळवळ जातीय चौकटीत खिळून ठेवण्यापेक्षा वेगळे पाडण्यात आलेल्या सर्वहारा, शोषित आणि बहिष्कृतांना एकत्रित करून वर्गीय बांधणी करावी लागेल, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक, कवी आणि विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नागपूर विभागीय केंद्रातर्फे आयोजित यशवंत महोत्सवात मंगळवारी ‘दलित पँथरचा उत्तरार्ध’ विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी वक्ता म्हणून डॉ. प्रकाश खरात, डॉ. प्रदीप आगलावे, नगरसेविका वंदना भगत, प्रा. रश्मी सोवनी उपस्थित होते. व्यासपीठावर गिरीश गांधी, समीर सराफ उपस्थित होते. डॉ. मनोहर म्हणाले, एक शासन आर्थिक कोंडी करते तर दुसरे शासन धार्मिक सरंजामशाही लादत आहे. वर्तमानात धार्मिक दडपशाहीतून विशिष्ट जाती, धर्म व वर्गाला वेगळे पाडण्याचे कारस्थान होते आहे. या दोन्ही मूलतत्त्वात हजारो वर्षांपासून सामान्य माणूस नागवला गेला आहे. बाबासाहेबांची राजकीय मर्मदृष्टी या नागवलेल्या माणसाला न्याय देण्याची होती. त्यांच्यासमोर कुणी परका नव्हता. शोषित,
बहिष्कृ त समाज त्यांच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी होता. मात्र यांनी जाती-पोटजातीच्या नावाने रिपब्लिकन पक्षाचे तुकडे केले. तुम्ही संविधान मानत असल्याने जाती-धर्माचे राजकारण जुळविणे तुम्हाला शक्य नाही. त्यामुळे विशिष्ट धर्माचे, विचारांचे तत्त्वज्ञान बाजूला ठेवून देशातील सर्वहारा समुदाय व समाजाला एकत्रित करावे लागेल, तेव्हाच माणूस, समाज आणि मानवी मूल्य टिकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
विचार व्यक्त करताना डॉ. प्रकाश खरात यांनी सांगितले की, सामाजिक न्यायाचा उद्देश घेऊन निर्माण झालेल्या दलित पँथरमुळे त्यावेळी शोषणकर्त्यांमध्ये व राज्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती व त्यांच्या कार्याची चर्चा जगभर पसरली होती. ही चळवळ आता संथ असली तरी थांबलेली नाही; कारण यात बुद्ध, फुले व डॉ. आंबेडकरांच्या समानतेच्या विचारांचे अधिष्ठान प्राप्त आहे. जोपर्यंत आर्थिक, सामाजिक शोषण आहे, तोपर्यंत ही चळवळ धगधगत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ. प्रदीप आगलावे यांनी, दलित पँथरच्या अधोगतीला राजकारणातील सवर्णांची प्रतिक्रांती जबाबदार असल्याचे मनोगत व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून निर्माण झालेल्या चळवळी या सूज्ञ व शोषणाच्या विरोधात उभ्या झालेल्या चळवळी होत्या. यातून केवळ संघर्षच नाही तर प्रस्थापितांना लाजवेल, असा साहित्यिक व सांस्कृतिक वारसा निर्माण केला. सक्षम व्यक्तिविरोधात असक्षम व्यक्ती उभा करून या आदर्श चळवळीला मोडित काढण्याचा प्रयत्न झाल्याची टीका त्यांनी केली. प्रा. रश्मी सोवनी यांनी फाटाफुटीच्या प्रवाहामुळे दलित पँथर अपयशी ठरल्याचे मत व्यक्त केले. असे असले तरी दलित चळवळीने शोषित, वंचितांच्या संघर्षात प्रेरणा निर्माण केली आहे. दलित तरुण परिणामाची पर्वा न करता सूज्ञपणे अन्यायाविरोधात उभा राहण्यास तयार असतो, त्यामुळे अद्याप एक आशा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. वंदना भगत यांनी पँथरची चळवळ थांबली नसून पूर्वीसारखा त्याचा दरारा आणि धग कायम असल्याचे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. संचालन राजेश पाणूरकर यांनी केले. रमेश बोरकुटे यांनी आभार मानले.