आम्हाला नागपूर आवडतं! राहण्यायोग्य शहराच्या यादीत २५ वे स्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:07 AM2021-03-05T04:07:46+5:302021-03-05T04:07:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूरकरांना नागपुरातच राहायला, येथे येऊन कायमचे नागपूरकर व्हायला अनेकांना आवडते. यामुळेच राहण्यायोग्य शहराच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरकरांना नागपुरातच राहायला, येथे येऊन कायमचे नागपूरकर व्हायला अनेकांना आवडते. यामुळेच राहण्यायोग्य शहराच्या यादीत नागपूरचा ३१ वर गेलेला क्रमांक यंदा २५ वर आला आहे. म्हणजेच सहा क्रमांकाने परत झेप घेतली आहे. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयातर्फे ‘इज ऑफ लीविंग इंडेक्स’ गुरुवारी जाहीर करण्यात आले आहेत.
राहण्यायोग्य असलेल्या देशातील टॉप शहरांच्या यादीत शिमला व बंगळुरू पहिल्या क्रमांकावर आहेत, तर दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या राहण्यायोग्य शहराच्या यादीत इंदूर एक नंबरवर आहे. पहिल्या दहा शहरात महाराष्ट्रातील पिंपरी-चिचवड, पुणे व मुंबई या शहरांचा समावेश आहे, तर नागपूरचा क्रमांक २५वा आहे. मागील वेळी नागपूर ३१ व्या क्रमाकांवर होते. यावेळी यात सुधारणा झाली, पण पहिल्या २० शहरांच्या यादीत स्थान मिळालेले नाही.
महापालिका क्षेत्रात महापालिकेने जनतेला कशाप्रकारे मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या याचे आकलन ''इज आफ लीविंग इंडेक्स'' या उपक्रमात केले जाते.या उपक्रमात देशातील १११ शहरांनी आपला सहभाग नोंदविला होता. यामधून नागपूरचे रँकिंग ३१वरून २५ झाले आहे. तसेच महापालिका कामगिरी निर्देशांक २०२० या उपक्रमातही नागपूर महापालिकेने उत्कृष्ट कामगिरी बजावत १११ शहरांमधून ९वा क्रमांक पटकविला आहे.
महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, यातून प्रेरणा घेऊन आणखी मेहनत करण्याची गरज आहे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी म्हणाले की, महारपालिकेच्या कामाचे नागरिकांव्दारे मूल्यमापन करणे आणि त्यामध्ये १७ वा क्रमांक येणे, ही मोठी उपलब्धी आहे. स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी नागरिकांचे आभार व्यक्त केले. ऑनलाईन कार्यक्रमात स्मार्ट सिटीच्या सीईओ भुवनेश्वरी एस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे, कंपनी सेक्रेटरी श्रीमती भानुप्रिया ठाकुर, मुख्य वित्त अधिकारी नेहा झा, पर्यावरण विभागाच्या महाव्यवस्थापक डॉ. प्रणिता उमरेडकर उपस्थित होते