रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 05:29 AM2024-10-12T05:29:05+5:302024-10-12T05:29:34+5:30
रामदास आठवले म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने पाच जागा दिल्या होत्या. परंतु चिन्ह भाजपचे होते. उमेदवारही त्यांचे होते. यंदा आम्ही आमच्याच चिन्हावर लढू.
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: भाजपसोबत रिपाइं जुळली तेव्हाच महायुती तयार झाली. सध्या महायुतीतील तिन्ही मोठे पक्ष जागेसाठी भांडत आहेत. परंतु, अद्याप जागेसंदर्भात आमच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही. रिपाइंला ८ ते १० जागा हव्या आहेत. याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, असे रिपाइंचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत सांगितले.
आठवले म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने पाच जागा दिल्या होत्या. परंतु चिन्ह भाजपचे होते. उमेदवारही त्यांचे होते. यंदा आम्ही आमच्याच चिन्हावर लढू. दोन राज्यात आमचे आमदार आहेत. आणखी दोन राज्यांत उमेदवार आल्यास राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल. महायुतीतील तीनही पक्षांनी त्यांच्या कोट्यातील तीन-तीन जागा द्याव्यात.
रिपब्लिकन पक्षाची स्थापना नागपुरात झाली. नऊ खासदार या रिपब्लिकन पक्षाचे निवडून आले होते. परंतु, नंतर गटबाजीमुळे पक्षात फूट पडली. नेत्यांमधील बेकीमुळे रिपब्लिकन पक्षाचे नुकसान झाले, अशी कबुलीही आठवले यांनी दिली.