मानसिक छळाच्या विरोधात दाद मागण्यासाठी प्लॅटफॉर्म हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:07 AM2021-03-27T04:07:23+5:302021-03-27T04:07:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ आणि मानसिक छळ या घटना महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी नव्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ आणि मानसिक छळ या घटना महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी नव्या नाहीत. लैंगिक छळाच्या विरोधात दाद मागण्यासाठी विशाखा समितीसारखे प्लॅटफॉर्म आहेत तसेच एखादा प्लॅटफॉर्म मानसिक छळाच्या विरोधात दाद मागण्यासाठी असावा, अशी प्रतिक्रिया महिला अधिकाऱ्यांनी लोकमतजवळ व्यक्त केली.
वनविभागातील अधिकारी दीपाली चव्हाण यांनी केलेल्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने काही महिला अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. आपले नाव न छापण्याच्या अटीवर या महिला अधिकारी व्यक्त झाल्या. वरिष्ठ अधिकारी बरेचदा स्टाफसमोर आणि बाहेरच्या व्यक्तीसमोर कंत्राटदारांसमोरदेखील महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांशी अपमानास्पद आणि लज्जास्पद बोलतात. मात्र अनेक कर्मचारी याबद्दल तक्रार करू शकत नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देताना त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये हा भाग असावा, अशी भावना व्यक्त होत आहे. कामात चूक झाली असल्यास अधिकाऱ्यांनी महिला कर्मचारी किंवा अधिकाऱ्याला आपल्या केबिनमध्ये बोलावून जाब विचारावा, हवे तर लेखी जाब मागावा. मात्र अशा पद्धतीने अपमान करणे टाळावे.
एक महिला अधिकारी म्हणाल्या, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या प्रतिबंधासाठी विशाखा समिती आहे. मात्र वनविभागासारख्या खात्यात दुर्गम भागात काम करणाऱ्या महिलांची संख्या कमी असते. या समितीमध्ये महिला असाव्यात, असा नियम असल्याने ही समितीच अनेक ठिकाणी अस्तित्वात नाही. परिणामतः दाद मागण्यासाठी व्यासपीठ असले तरी ते उपलब्ध नाही.
कामाच्या ठिकाणी अधिक वेळ थांबून ठेवणे, काम झाल्यावरदेखील थांबविणे, नाहक अपमानास्पद आणि लज्जास्पद बोलणे असे प्रकार होत असल्याचे एका महिला कर्मचाऱ्याने सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात जाणे म्हणजे नोकरीवर गंडांतर ओढवून घेण्यासारखे असल्याने यासंदर्भात तक्रार करण्याचे टाळले जाते, असा नेहमीचाच अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.