फडणवीस महाराष्ट्रातच रहावे अशी आमची इच्छा

By योगेश पांडे | Published: August 1, 2024 06:08 PM2024-08-01T18:08:35+5:302024-08-01T18:09:47+5:30

चंद्रशेखर बावनकुळे : राज्याच्या कल्याणासाठी फडणवीस महाराष्ट्रातच आवश्यक

We want Fadnavis to stay in Maharashtra | फडणवीस महाराष्ट्रातच रहावे अशी आमची इच्छा

We want Fadnavis to stay in Maharashtra

योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या राज्यातील नेत्यांना मात्र ते दिल्लीत जाऊ नये असेच वाटत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्कृष्ठ संघटक आहेत. त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्त्व घेईल. मात्र, राज्यातील १४ कोटी जनतेच्या कल्याणासाठी फडणवीसांचे शासनातील व संघटनेतील स्थान महत्वाचे आहे. ते महाराष्ट्रात राहावे असेच आम्हाला वाटते, असे बावनकुळे म्हणाले. नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी भाजपच्या संवाद यात्रेवरदेखील भाष्य केले. ९ ते ११ ऑगस्ट दरम्यान भाजपा संवाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्य ढवळून काढणार आहे. या यात्रेदरम्यान राज्यातील मंडल स्तरावरील ७५० ठिकाणी भाजपाचे अधिवेशन होईल. भाजपाच्या ६९ संघटनात्मक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हास्तरीय अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील ३६ नेते मुक्कामी जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर महानगर, नागपूर ग्रामीण व अमरावती येथे तर मी स्वत: वर्धा व भंडारा येथे अधिवेशनात सहभागी होणार आहे. या माध्यमातून राज्यातील महायुती सरकार व केंद्रातील मोदी सरकारच्या योजनांची माहिती आम्ही समाजातील अखेरच्या माणसापर्यंत पोहचविण्यावर भर देण्यात येणार आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

डीपीसीच्या पैशातून कॉंग्रेसने मेळावे घेतले
नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीपीसीमधून विकासकामांसाठी निधी दिला. कॉंग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी या निधीचा वापर राजकीय कारणासाठी व पक्षाचे मेळावे घेण्यासाठी केला होता. आरोग्य आणि महिला बाल कल्याण विभागाचे मेळावे पक्षासाठी घेण्यात आले. जनतेचा पैसा खर्च केला, असा आरोप बावनकुळे यांनी केला.

मविआ सरकार आले तर लाडकी बहीण बंद करतील
राज्यात जर महाविकास आघाडीचे सरकार आले तर लाडकी बहिण, शेतकऱ्यांना मोफत वीज यासह महायुती सरकारच्या व मोदी सरकारच्या योजना बंद करतील, असा दावा बावनकुळे यांनी केला. मुंबई आणि कोंकणातून मतं गेल्याने उद्धव ठाकरे चिंतेत आहेत. त्यातूनच त्यांनी पंतप्रधान मोदींविषयी खोटा प्रचार केला, असा आरोप त्यांनी केला. महायुतीमध्ये कोणती जागा कोण लढणार हा निर्णय युतीमधील तिन्ही पक्षाचे नेते व भाजपाचे केंद्रीय नेतृत्व घेईल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: We want Fadnavis to stay in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.